scorecardresearch

ठाण्यात राज ठाकरेंची उद्या जाहीर सभा; मनसेच्या वर्धापनदिन होतोय पहिल्यांदाच ठाण्यात साजरा

गेल्या तीन महिन्यात राज ठाकरे यांनी शहरात विविध कार्यक्रमानिमित्ताने दोन दौरे केले.

raj thackeray s public rally in thane
राज ठाकरे (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ अशी फलकबाजी

ठाणे : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट), ठाकरे गट, भाजप आणि राष्ट्रवादीकडून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली ताकद दाखविण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, आता दरवर्षी मुंबई साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन ठाण्यात पहिल्यांदाच साजरा केला जाणार आहे. उद्या, गुरुवारी हा कार्यक्रम होणार असून यानिमित्ताने राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरण निर्मिती केली असून त्याचबरोबर सभेच्या निमित्ताने पक्षाची ताकद दाखविण्यासाठी मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेतील नगररचनेत ठाण मांडलेल्या अभियंत्यांची उचलबांगडी

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्ता बदलाचे केंद्र असलेल्या ठाणे शहरात शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटामध्ये शाखा ताब्यात घेण्याच्या तसेच इतर कारणांमुळे वादाचे प्रसंग घडत आहेत. या दोन्ही गटांसह भाजप आणि राष्ट्रवादीकडूनही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये मनसे मात्र अलिप्त असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यात राज ठाकरे यांनी शहरात विविध कार्यक्रमानिमित्ताने दोन दौरे केले. या दौऱ्यांच्यानिमित्ताने त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ आता दरवर्षी मुंबई साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन ठाण्यात पहिल्यांदाच साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून गुरुवार, ९ मार्च रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यात राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत मोठागाव मधील तरुणांना रेल्वे पुलावर १५ जणांची बेदम मारहाण

ठाण्यात होणाऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्यानिमित्ताने मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांकडून ‘संघर्षाची तयारी… पुन्हा एकदा भरारी’ अशा पोस्ट समाजमाध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून प्रसारित केल्या जात होत्या. त्यापाठोपाठ आता सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरण निर्मिती केली असून त्याचबरोबर सभेच्या निमित्ताने पक्षाची ताकद दाखविण्यासाठी मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज ठाकरे हे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी एक सभा घेतली होती. ही सभा गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोरील चौकात झाली होती. या सभेमध्ये ठाणे जिल्ह्यातून कार्यकर्ते पदाधिकारी आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील मशीदींवरील भोंग्यांसदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर अनेक मशीदींवरील भोंगे त्यावेळी उतरविले गेले होते. सध्या राज्यात सत्ताबदल झाले असून शिंदे- फडणवसी सरकार सत्तेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्धापनदिनानिमित्ताने सत्ताधाऱ्यांबद्दल काय भूमिका घेतात याकडे मनसेच्या नेत्यांचे लक्ष लागून आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 19:08 IST