उल्हासनगरः उल्हासनगर भाजप जिल्हा अध्यक्षपदी राजेश वधारिया यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी प्रदीप रामचंदानी अध्यक्ष होते. विशेष म्हणजे राजेश वधारिया यांचा प्रवास हा कलानी समर्थक, राष्ट्रवादी कॉंग्रेस ते टीम ओमी कलानी आणि भाजप असा अनोखा राहिला आहे. वधारिया हे एकेकाळी सुरेश उर्फ पप्पू कलानी यांचे खंदे समर्थक होते. कलानी तुरूंगात गेल्यानंतर वधारिया यांनी ज्योती कलानी आणि ओमी कलानी यांना साथ दिली.

उल्हासनगर महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत जेव्हा भाजपने शिवसेनेची साथ सोडत स्वबळावर निवडणूक लढवली त्यावेळी टीम ओमी कलानी समर्थकांनी भाजपला बळ दिले. त्यात वधारिया हे आघाडीवर होते. अडीच वर्षे महापौरपद भोगल्यानंतर पंचम कलानी यांनी भाजपशी फारकत घेतली. मात्र राजेश वधारिया भाजपातच राहिले. पुढे वधारिया आणि कलानी यांच्यातील संबंध बिघडले. कलानी समर्थक आणि वधारिया यांच्यात अनेकदा खटकेही उडत राहिले. मात्र वधारिया यांनी भाजपात राहून कलानींना आव्हान दिले. यंदा प्रथमच उल्हासनगरात भाजपच्या अध्यक्षपदी आठ वर्षांपूर्वी भाजपात आलेल्या वधारिया यांना जिल्हा अध्यक्षपद दिल्याने चर्चांना उधान आले आहे. यापूर्वी भाजपातील जुन्या जाणत्यांकडे हे पद होते.