ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील श्री मां स्नेहदीप विद्यालय येथे गतिमंद विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. रक्षाबंधन सणाच्यापूर्वीच या शाळेत उत्साह पाहायला मिळाल. या उपक्रमात शाळेतील मुख्याध्यापकांसह सर्व शालेय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ठाण्यातील घोडबंदररोडवरील श्री मां स्नेहदीप विद्यालयात ठाण्याच्या शाळेतील विविध शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गतिमंद विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी गतिमंद विद्यार्थीनींनी नियमित शाळेतील विद्यार्थ्यांना तर नियमित शाळेतील विद्यार्थिनींनी गतिमंद विद्यार्थ्यांना राखी बांधली.
गतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणण्यासाठी हा एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. १९८९ मध्ये गतिमंद विद्यार्थ्यासाठी ही शाळा सुरु करण्यात आली असून गेल्या २१ वर्षांपासून ही शाळा हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती शाळेच्या मुख्याधापिका मंजू तेजवानी यांनी दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गतिमंद विद्यार्थ्यांची ओळख आणि मैत्री झाल्याचेही मुख्याध्यापिकांनी सांगितले.