प्रवासी भयभीत; चार जणांना अटक

कल्याण : लखनौहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी सायंकाळी इगतपुरीजवळील घाटात सामूहिक बलात्कार आणि दरोड्याची भीषण घटना घडली.

 आठ ते दहा दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये शिरून शस्त्रांचा धाक दाखवत प्रवाशांकडील रोख रक्कम आणि मोबाईल लुटले. या लुटमारीदम्यान दरोडेखोरांनी एका महिलेवर तिच्या पतीदेखतच  बलात्कार केला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

काही धाडसी प्रवाशांनी पकडलेल्या दोघांसह एकूण चार दरोडेखोरांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक  केली असून या गुन्ह्यात लुटलेल्या ९६ हजार ३९० रुपयांचा ऐवज जप्त केला.

 गुन्हा करून दरोडेखोर डब्यातून पळून जात होते. तेव्हा दरोडेखोरांकडे शस्त्र असतानाही काही प्रवाशांनी धाडस दाखवत दोन दरोडेखोरांना पकडले. या दोघांना प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून माहिती घेऊन आणखी दोघांना पकडण्यात आले.  हे चौघेही १९ ते २१ वयोगटातील असून त्यातील तिघे नाशिकमधील इगतपुरी, घोटी भागातील

तर, एकजण मुंबईतील मालाड भागातील रहिवाशी आहे. त्यांचे उर्वरीत साथीदारही इगतपुरी, घोटी परिसरातील असल्याचे तपासात समोर आले. फरार दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग आणि गुन्हे अन्वेषण विभागाची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.  कसारा आणि कल्याण येथे सर्वच प्रवाशांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. पिडीत महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती व्यवस्थित आहे, अशी माहीती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

 चौघे ताब्यात..

कल्याण रेल्वे स्थानक येताच सज्ज असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी दोन लुटारुंना ताब्यात घेतले. प्रकाश पारधी, अर्षद शेख अशी त्यांची नावे आहेत. अंमली पदार्थांचे व्यसन या लुटारुंना असावे. त्यामुळे पैशासाठी त्यांनी हा प्रकार केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दोघांकडे चौकशी करून पोलिसांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांना अटक करण्यात आली.

घडले काय?

’पुष्पक एक्स्प्रेस शुक्रवारी सायंकाळी  सहा वाजता इगतपुरी स्थानकात आली. तेथे प्रवासी म्हणून चढलेल्या आठ ते दहा दरोडेखोरांनी चाकू आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना मारहाण केली.

’या दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत प्रवाशांकडील रोख रक्कम आणि मोबाईल लुटले.

’नऊ मोबाईल, सहा प्रवाशांकडील रोख रक्कम असा एकूण ९६ हजार ३९० रुपयांचा ऐवज त्यांनी लुटला.

’याच डब्यात एक महिला तिच्या पतीसह प्रवास करीत होती. तिच्यावर या दरोडेखोरांनी  बलात्कार केला.