ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीवर आता रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिक्रिया व्यक्त केली. बेस्टच्या निवडणुकीत पाहिले असेल की, पुर्वीची क्रेझ संपली, असा टोला त्यांनी ठाकरे बंधूंना यावेळी लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मागली तीन महिन्यातील ही चौथी भेट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हि भेट महत्वाची मानली जात आहे. तसेच ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून या भेटीवर आता रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिक्रिया व्यक्त केली.

ठाकरे बंधूंचे मनोमिलन होत असून त्यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर तुमचे काय मत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी आनंदराज यांना विचारला. त्यावर बेस्टच्या निवडणुकीत पाहिले असेल की, पुर्वीची क्रेझ संपली, असा टोला त्यांनी ठाकरे बंधूंना यावेळी लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हें रस्त्यावर उतरून लढणारे नेते आहेत, असे सांगत त्यांनी शिंदेचे कौतुक केले.

आंबेडकर बंधूही एकत्र येऊ शकतात

दलित पँथरचे अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी बुधवारी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत ठाण्यात रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम ठाण्यात पार पडला. यानंतर आनंदराज यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ठाकरे बंधूंप्रमाणेच आंबेडकर बंधूंचे मनोमिलन होणार का आणि ते एकत्र येणार का असा प्रश्न पत्रकारांनी आंबेडकर यांना विचारला. त्यावर राजकारणात कधीही काही होऊ शकते. जसे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही आंबेडकर बंधूही एकत्र येऊ शकतो, असे सूचक उत्तर त्यांनी यावेळी दिले.

कार्यकर्त्यांसाठी युती आजपर्यंत केवळ आंबेडकरी नेत्याकरीता युती होत होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर झालेली रिपब्लिकन सेनेची युती ही कार्यकर्त्यांकरीता झाली आहे. या युतीने कार्यकर्त्यांना आशा निर्माण झाली आहे की ते सत्तेत जाऊ शकतील. तसेच आमची युती शिंदेच्या शिवसेनेबरोबर झाली आहे. त्यामुळे त्यांना महायुतीत ज्या जागा मिळतील त्यातील दहा टक्के जागा ते आम्हाला देणार आहेत, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिंदे आणि माझे सुरवातीला जिल्हास्तरावर मेळावे होतील. त्यानंतर आम्ही दोघेही राज्यात दोरे काढू असेही त्यांनी सांगितले.