बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त सोडतीद्वारे काढण्यात आलेले प्रभाग आरक्षण सदोष असून त्याविरोधात हरकत घेतलेल्या हरकतदारांनी लाक्षणिक उपोषण करून राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रभाग आरक्षण सोडतीच्या वेळी पालिका प्रशासनाकडून अक्षम्य चूक झाली होती. प्रभाग क्र. २१ हा यापूर्वी महिलांसाठी आरक्षित होता; परंतु तो सोडतीत पुन्हा महिलांसाठी आरक्षित झाल्याने या प्रक्रियेत गडबड झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे ही फेरसोडत घ्यावी लागली होती. नितीन देशमुख, तुषार साटपे, विजय सातपुते या हरकतदारांनी हरकत घेतल्याने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी पत्र आले होते. या हरकतदारांनी सांगितल्याप्रमाणे हे हरकतदार जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहिले असता, जिल्हाधिकाऱ्यांनी कोणाचेही
म्हणणे ऐकून घेतले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.