नळजोडणी रखडल्यामुळे पाले गावात बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध घोषणाबाजी
अंबरनाथ : विविध राज्यमार्ग आणि मेट्रोसारख्या नव्या साधनांनी आणि प्रेक्षणीय स्थाने विकसित करत अंबरनाथसारख्या शहरांचा विकास केला जात असला, तरी शहराच्या विस्तारित भागांत आजही पाण्यासाठी टोलेजंग इमारतीतील नागरिकांना मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. लाखो रुपयांची घरे विकत घेऊनही नागरिकांना वर्षांनुवर्षे टँकर आणि कूपनलिकांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांत संताप आहे. अंबरनाथमध्ये नुकत्याच एका नामवंत बांधकाम कंपनीच्या गृहप्रकल्पातील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध आंदोलन केले. पाले गाव भागात विविध कारणांनी नळजोडणी रखडल्याने बांधकाम व्यावसायिकही हतबल झाले आहेत.
अंबरनाथ शहराचा विस्तार आता चारही बाजूने होतो आहे. शिवमंदिर परिसराच्या मागच्या बाजूस पाले गाव सध्या नवनव्या इमारतींचे केंद्र ठरते आहेत. मुंबई आणि उपनगरांतील नामांकित बांधकाम कंपन्यांचे प्रकल्प या भागात सुरू आहेत. एका बाजूला काटई-कर्जत राज्यमार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास सोपा होतो आहे. तर दुसरीकडे याच भागातून कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो रेल्वेची मार्गिका प्रस्तावित आहे. त्यामुळे या भागात गेल्या काही वर्षांत मोठय़ा संख्येने नागरीकरण झाले. अद्ययावत सोयीसुविधा असलेल्या टोलेजंग इमारती या भागात उभ्या राहिल्या. लाखो रुपयांच्या सदनिका नागरिकांनी विकत घेतल्या. मात्र सर्व सुविधा असल्या तरी येथील पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात अद्याप संबंधित यंत्रणेला यश आलेले नाही. पाले भागात पाण्याच्या व्यवस्थेसाठी बांधकाम व्यावसायिकांनी बाजारभावानुसार कोटय़वधींची जमीन जलकुंभ बांधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिली होती. त्यावर सुमारे ९० लाख रुपये खर्चून जलकुंभ बांधण्यात आले. मात्र अवघ्या ८० मीटर जलवाहिनी टाकली गेली नसल्याने या कुंभात अद्याप थेंबही पडू शकलेला नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना आजही टँकर आणि कूपनलिकांच्या पाण्यावर गुजराण करावी लागते आहे. लाखो रुपयांची घरे घेऊनही आम्हाला जर कूपनलिकांचेच पाणी मिळणार असेल तर ही फसवणूक आहे अशा संतप्त भावना येथील रहिवासी व्यक्त करत आहेत.
सातत्याने हे पाणी वापरल्याने रहिवाशांना विविध आजार जडू लागल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे हक्काचे पाणी मिळवण्यासाठी गुरुवारी एका नामांकित गृहसंकुलातील रहिवाशांनी एकत्र येत मोर्चा काढला. यावेळी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिलावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता. पाण्याचा प्रश्न वेळीच न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी रहिवाशांनी दिला.
आंदोलनामुळे बांधकाम व्यावसायिकही हतबल
येथील जलकुंभात जोडणी देण्यासाठी अवघ्या ८०० मीटरची जलवाहिनी टाकणे गरजेचे आहे. मात्र काही जमीन मालकांचा विरोध असल्याने ते सातत्याने या कामात अडथळा आणतात. एकदा येथे कर्मचाऱ्यांवर दगडफेकही झाली होती. स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतल्याने हे काम स्थगित करण्यात आले आहे. प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण निकाली निघाल्यानंतरच हे काम पूर्ण करणे शक्य असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. आर. शिंदे यांनी सांगितले आहे. मात्र जीवन प्राधिकरण आणि स्थानिकांच्या वादात रहिवासी मात्र पाण्यापासून वंचित राहत आहेत. रहिवाशांच्या आंदोलनामुळे बांधकाम व्यावसायिक हतबल झाले असून त्यांच्या घर विक्रीवरही याचा परिणाम होतो आहे.