ठाणे पालिकेचा देशातील पहिला प्रकल्प

विविध प्रकारचे पर्यावरणस्नेही उपक्रम राबविणाऱ्या ठाणे महापालिकेने आता घनकचऱ्यातील थर्माकोलवर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून प्रतिदिन एक टन थर्माकोलवर या प्रकल्पात प्रक्रिया होऊ शकणार आहे.

अविघटनशील असल्याने घनकचऱ्यातील थर्माकोलची विल्हेवाट ही मोठीच डोकेदुखी ठरते. या प्रकल्पामुळे थर्माकोलचा पुनर्वापर होणार असल्याने ही समस्या बऱ्याच अंशी कमी होणार आहे. थर्माकोलचा पुनर्वापर करणारा प्रकल्प राबविणारी ठाणे ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.  प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याबाबत जागृती होईल. नाले तुंबण्याचे प्रमाण कमी होईल. क्षेपणभूमीपर्यंत कचरा वाहून नेण्याच्या वाहतूक खर्चात बचत होईल. थर्माकोलमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण या प्रकल्पामुळे बऱ्याच प्रमाणात कमी होईल. या प्रकल्पाचा कोणताही भांडवली व महसुली भार महापालिकेवर पडणार नाही आदी अनेक वैशिष्टय़े या प्रकल्पाबाबत  सांगितली जात आहेत.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज ७०० टन कचरा जमा होतो. त्यामधून ओला व सुका कचरा वेगळा केला जाणार आहे. सुक्या कचऱ्यात मोठय़ा प्रमाणात थर्माकोलचे प्रमाण असते. त्याच्यावर शास्त्रीय पद्धतीने  प्रक्रिया करून तो पुन्हा वापरात आणण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव येत्या महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

 – संजय मोरे, महापौर, ठाणे