सुभाषनगर भागात बुधवारी पहाटे प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकावर एका प्रवाशाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. यात जखमी झालेल्या रिक्षाचालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुभाषनगर परिसरातील एका चाळीत राहणारे ओमप्रकाश विद्याधर तिवारी (४५) रिक्षाचालक आहेत. बुधवारी पहाटे ओमप्रकाश सुभाषनगर येथून रविस्टील नाक्याकडे रिक्षा घेऊन जात होते. त्या वेळी मोदी हुंदाई शोरूमसमोर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांची रिक्षा थांबवली आणि महिला नातेवाईकास घोडबंदर रोड येथे घेऊन जायचे आहे, असे सांगितले. मात्र, त्यास ओमप्रकाश यांनी नकार दिला. तसेच रिक्षा आताच काढली असून गॅस भरण्यासाठी जात आहे. त्यामुळे मला वेळ नाही, असे सांगितले. संतप्त प्रवाशाने ओमप्रकाश यांच्यावर चाकूचे वार केले. यात  त्यांच्या कमरेवर आणि कोपऱ्यावर जखमा झाल्या आहेत.