scorecardresearch

रिकॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ देण्याची रिक्षा महासंघाची कल्याण ‘आरटीओ’कडे मागणी

कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील रिक्षा चालकांना रिक्षा मीटरमधील फेरफारसाठी (रिकॅलिब्रेशन) मुदतवाढ देण्यात यावी.

रिकॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ देण्याची रिक्षा महासंघाची कल्याण ‘आरटीओ’कडे मागणी
(रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशनसंदर्भात कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांना निवेदन देताना रिक्षा टॅक्सी कोकण महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर, संतोष नवले, शेखर जोशी, विनायक सुर्वे.)

कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील रिक्षा चालकांना रिक्षा मीटरमधील फेरफारसाठी (रिकॅलिब्रेशन) मुदतवाढ देण्यात यावी. रिकॅलिब्रेशन विहित मुदतीत केले नाही म्हणून दर दिवसाला रिक्षा चालकांकडून ५० रुपये दंड रिक्षा चालकांकडून आकारला जात आहे. हे रिक्षा चालकांवर अन्यायकारक आहे. कल्याण उपरिवहन क्षेत्रातील ५६ हजार रिक्षांचा विचार करता रिक्षा चालकांना मीटरमधील फेरफारासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी आणि अन्यायकारक ५० रुपये दंड वसुली करणे बंद करावे, अशी मागणी कोकण महासंघ रिक्षा टॅक्सी महासंघातर्फे प्रणव पेणकर यांनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>>ठाणे : मोबाईल चोरला पण आरोपी दुचाकीवरून पडला, पोलिसांच्या ताब्यात येताच मोठी टोळी गजाआड, २० महागडे मोबाईल जप्त

रिक्षा मीटर भाडे दरात २३ रुपये वाढ झाल्यानंतर रिक्षा चालकांनी रिक्षा मीटरमध्ये योग्य फेरफार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून १६ जानेवारीपर्यंत करणे आवश्यक होते. अनेक रिक्षा चालकांनी परिवहन आयुक्तांच्या या आदेशाकडे दुर्लक्ष केले. प्रवासी भाडेवाढ करुनही रिक्षा चालक मीटर फेरफार करुन घेत नसल्याने काही रिक्षा चालक अवाजवी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे येऊ लागल्या. ज्या रिक्षा चालकांनी १६ जानेवारीपर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून मीटर फेरफार करुन घेतले नाहीत त्यांच्याकडून आता विहित मुदतीत मीटर फेरफार करुन घेतले नाहीत म्हणून ५० रुपये दंड आकारुन फेरफार करुन दिले जात आहेत, हे अन्यायकारक आहे असे रिक्षा चालकांनी सांगितले.

हेही वाचा >>>कल्याण मध्ये मैत्रिणीच्या वादातून अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण

दंडात्मक कारवाई सुरू होताच कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांनी आता मीटर फेऱफारसाठी गर्दी केली आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात ५६ हजार रिक्षा आहेत. दररोज काही संख्येत या रिक्षांचे मीटर फेरफार अधिकाऱ्यांनी करायचे ठरविले तरी खूप झुंबड उडणार आहे. रिक्षा चालकांना रिकॅलिब्रेशन प्रक्रियेसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. ५० रुपये आकारण्यात येणारा दंड कमी करावा, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर, कार्याध्यक्ष संतोष नवले, डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचे शेखर जोशी, महासंघाचे सचिव विनायक सुर्वे यांनी आरटीओ अधिकारी साळवी यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>>Video : कधी चौकार, तर कधी षटकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

रिक्षा मीटर कॅलिब्रेशन करुन घेणे हा परिवहन विभागाचा धोरणात्मक निर्णय आहे. परिवहन विभागाने दिलेल्या मुदतीत कॅलिब्रेशन करुन घेणे हे रिक्षा चालकांचे काम होते. आता दंडात्मक रक्कम आकारणी सुरू केल्यावर रिक्षा चालक जागरुक होऊन कॅलिब्रेशन करणे, दंड न आकारणे अशी मागणी करू लागले आहेत. याविषयी रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यानी निवेदने दिली आहेत. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे याविषयी कार्यवाही होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.अधिक माहितीसाठी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांना संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 14:04 IST

संबंधित बातम्या