उष्ण वातावरणामुळे नागरिक हैराण
लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. उष्ण वातावरणामुळे उकाडा वाढला असून जिल्ह्य़ातील
जवळपास सर्वच शहरांमध्ये सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत आद्र्रताही वाढली आहे. गेल्या आठवडय़ाभरात जिल्ह्य़ातील तापमान ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढले असल्याची नोंद झाली आहे.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात तापमानात घट झाली होती. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ापासून वातावरणात बदल दिसू लागले आहेत. गेल्या आठवडय़ाभरात ठाणे जिल्ह्य़ातील तापमान ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढले आहे. मागील आठवडय़ात जिल्ह्य़ात सरासरी ३३ अंश सेल्सिअस तापमान होते. या आठवडय़ात जिल्ह्य़ाचा पारा वाढला असून तापमान सरासरी ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील डोंबिवली, कल्याण, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांतील तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी उन्हाच्या झळा वाढत असताना कोविडमुळे टाळेबंदी लागू झाली होती. त्यामुळे बहुतांश नोकदरांचा उन्हाळा घरीच गेला होता. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत.
