डोंबिवली- डोंबिवली पश्चिमतील देवीचापाडा येथील बाह्यवळण रस्त्याचा पोहच मार्ग दोन दिवसापूर्वी माती, डांबराच्या लगद्यांच्या तुकड्यांच्या भरावाने बंद करण्यात आला आहे. वर्दळीच्या मुख्य पोहच रस्ता वाहतुकीसाठी अज्ञात इसमांनी बंद केल्याने पादचारी, रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात कल्याण डोंबिवली पालिकेचा बांधकाम विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. याविषयी आम्हाला काही माहिती नाही अशी उत्तरे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौकातून जगदांबा माता मंदिर येथे भोईर नाल्याच्या बाजुने समांतर बाह्यवळण रस्त्यासाठी एक पोहच रस्ता जातो. तीन वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेने या पोहच रस्त्याचे सर्व्हेक्षण करुन रस्ता सीमारेषा निश्चित केली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या शेतकऱ्यांच्या भूखंडांचे सीमांकन करण्यात आले आहे.
या कच्च्या रस्त्यावरून मागील चार ते पाच वर्षापासून जगदंबा माता मंदिर भागात राहणारे रहिवासी, शाळकरी मुले, खाडीवर जाणारे नागरिक येजा करतात. देवीचापाडा भागात अनेक शेतकऱ्यांकडे गाई, म्हशी आहेत. त्यांना चरायला नेण्याचा रस्ता या पोहच रस्त्यावरुन आहे. वर्दळीच्या या रस्त्यावर शुक्रवारपासून अज्ञात इसमांनी मातीचे ढिगारे ट्रकमधून आणून टाकले आहेत. लक्ष्मी नारायण कृपा सोसायटी, माऊल चाळ ते जगदंबा माता मंदिर दिशेने हे ढिगारे टाकण्यात आले आहेत. रस्ता बुजवून भूमाफियांना चाळी बांधायच्या आहेत का असा प्रश्न देवीचापाडा भागात विचारला जात आहे.
ह प्रभाग पालिकेचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, या विभागातील बांधकाम विभागाला पालिकेचा रस्ता बंद केला जात असताना खबर नसल्याने आश्चर्य आणि रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. या पोहच रस्त्याच्या बाजुला काशिनाथ भोईर या शेतकऱ्याची जमीन आहे. या शेतकऱ्याच्या भूखंडात मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने भोईर यांनी पालिकेकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. आपणास विचारल्या शिवाय या ढिगांचे सपाटीकरण करायचे नाहीअशा तक्रारी या भागातील शेतकऱ्यांनी केल्याने ढिगारे टाकणारे अडचणीत आले आहेत, असे समजते.
कडोंमपा हद्दीतील बाह्यवळण रस्ता मार्गी लागावा म्हणून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे प्रयत्नशील आहेत. याआधीच्या आयुक्तांनी हा मार्ग पूर्ण व्हावा म्हणून प्रयत्न केले. देवीचापाडा ते मोठागा वळण रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्या रस्त्याला हा पोहच रस्ता आहे. नवीन आयुक्त पालिकेत दाखल होताच वळण रस्त्याचा पोहच रस्ता मातीचे ढिगारे टाकून बंद करण्यात आल्याने स्थानिक रहिवासी हैराण आहेत. याविषयी आयुक्त डाॅ. दांगडे यांना अंधारात ठेवण्याचे आल्याचे समजते.
गोपीनाथ चौक भागातील पावसाचे पाणी पोहच रस्त्याने खाडी दिशेने वाहून जात होते. रस्ते मार्गात मातीचे ढिगारे टाकल्याने माऊली चाळीजवळ पावसाचे पाणी तुंबू लागले आहे. चिखल होण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस पडला तर ढिगाऱ्यांमुळे पाणी अडून ते माऊली चाळीत आणि गोपीनाथ चौक दिशेने पसरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली.
डोंबिवली बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी आपण आत्ताच पदभार स्वीकारला आहे. यासंदर्भातची माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल असे सांगितले. ह प्रभागाचे बांधकाम विभागाचे उपअभियंता लिलाधर नारखडे, साहाय्यक अभियंता महेश गुप्ते यांनी यासंदर्भात आपणास काही माहिती नसल्याचे सांगितले. माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल असे उत्तर दिले.