ठाण्यातील दहा रस्त्यांचे विकास प्रस्ताव स्थायी समितीसमोर
पादचाऱ्यांसाठी व्यवस्थित पदपथ, वाहतूकपट्टय़ा, एकसारखे दिसणारे बसथांबे, पदपथावर बसण्यासाठी बाके, हिरवळ अशा सोयीसुविधा असलेले रस्ते ठाण्यात बनवायचे की नाही, याचा निर्णय उद्या, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत होणार आहे. ठाण्यातील दहा ‘मॉडेल’ रस्त्यांचा विकास करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावाला खर्चातील तफावतीचे कारण सांगत स्थायी समितीने नकार दिला होता. मात्र याबाबत पालिका प्रशासनाकडून बुधवारी स्पष्टीकरण मिळण्याची शक्यता असून त्यामुळे या रस्त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा शहरात रस्ते रुंदीकरण मोहीम राबविल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात दहा मॉडेल रस्ते विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. या रस्त्यांमुळे शहराची नवी ओळख निर्माण होईल आणि सुशोभीकरणात भर पडेल, असा प्रशासनाचा दावा आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने या प्रकल्पासाठी शहरातील दहा रस्त्यांची निवड केली असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये बॅ. नाथ पै मार्ग, एस. एम. जोशी मार्ग, कोलशेत रोड, आचार्य अत्रे मार्ग आणि कोर्टनाका या रस्त्यांचा समावेश असून या कामासाठी ५३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामांचे प्रस्ताव नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या सर्व रस्त्यांच्या विकासाचे मॉडेल एकसारखे असतानाही प्रत्येक कामांसाठी ठेकेदाराने वेगवेगळे दर दिले आहेत. त्यामुळे यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय समिती सदस्यांकडून बैठकीत व्यक्त करण्यात आला. या वेळी प्रशासनाकडून योग्य स्पष्टीकरण मिळत नसल्यामुळे हे प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आले होते. यामुळे आयुक्त जयस्वाल यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान, येत्या बुधवारी पुन्हा स्थायी समितीची बैठक होणार असून त्यामध्ये या प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यासंबंधी चर्चा होणार आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनानेही हे दर वेगवेगळे असण्यामागची कारणे स्पष्ट केली असल्याचे समजते, तर या प्रस्तावासंदर्भात प्रशासनाने योग्य स्पष्टीकरण केले तर त्यास मान्यता दिली जाईल, अशी भूमिका स्थायी समितीने घेतली आहे.
मॉडेल रस्ता विकसित करण्याचा आराखडा एकसारखा असला तरी प्रत्येक रस्ता वेगवेगळा आहे. या रस्त्यांचा वाहतूक खर्च तसेच साहित्य या सर्वाचा खर्च वेगवेगळा येणार आहे. त्यामुळे येत्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावासंबंधी लेखी स्पष्टीकरण देण्यात येणार आहे
– रतन अवसरमोल, नगर अभियंता ठाणे महापालिका
मॉडेल रस्ते विकसित करण्यासंबंधीच्या प्रस्तावांमध्ये समितीने काही आक्षेप घेतले असून त्यासंदर्भात प्रशासनाकडून स्पष्टीकरण मिळाले नाही म्हणून ते तहकूब ठेवले आहेत. मात्र येत्या बुधवारी होणाऱ्या सभेत प्रशासनाकडून योग्य स्पष्टीकरण मिळाले तर त्यास मान्यता देण्यात येईल.
– संजय वाघुले, स्थायी समिती सभापती