डोंंबिवली – ठाकुर्ली चोळे गावात गावदेवीची तीन वर्षांनी येणारी जत्रा येत्या १३ ते १५ मे या तीन दिवसांच्या कालावधीत होणार आहे. या जत्रोत्सवासाठी ठाकुर्ली गावातील हनुमान मंदिराकडून बंदिश हाॅटेलकडे जाणारा रस्ता तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय चोळेगाव गाव उत्सव समितीने घेतला आहे. सोमवारपासूनच हा रस्ता बंद करण्यात आल्याने या रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्यास सुरूवात झाली आहे.
ठाकुर्ली चोळेगावात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर गावदेवीचे मंदिर आहे. मंदिर उत्सवासाठी मोकळे मैदान नसल्याने ग्रामस्थ अनेक वर्षापासून मंदिरा समोरील रस्त्यावर उत्सव साजरा करतात. या तीन दिवसांच्या कालावधीत गावात जत्रा भरते. चोळेगाव, खंबाळपाडा, ठाकुर्ली, नवापाडा गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन दर तीन वर्षांनी हा जत्रोत्सव साजरा करतात. यावेळी १३ ते १५ मे कालावधीत जत्रोत्सव साजरा होणार आहे.
चोळेगाव हनुमंदिर, गावमंदिर रस्ता ते बंदिश पॅलेश दिशेने जाणारे प्रवासी या बंद केलेल्या रस्त्यावरून येजा करतात. डोंबिवली एमआयडीसी, ९० फुटी रस्ता, आजदे, सागर्ली परिसरातील नोकरदार वर्ग ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी या बंद केलेल्या रस्त्याचा वापर करतो. हा रस्ता आता बंद राहणार असल्याने रिक्षा चालक, मोटार चालक, दुचाकी स्वार यांना ठाकुर्ली रेल्वे स्थानक, हनुमान मंदिर, म्हसोबा चौक येथून इच्छित स्थळी जावे लागणार आहे. बंदिश पॅलेस हाॅटेलकडून रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांना म्हसोबा चौक येथून ठाकुर्ली हनुमान मंदिर येथून ठाकुर्ली रेल्वे स्थानकात यावे लागणार आहे.
या जत्रोत्सवाच्या काळात ठाकुर्ली, चोळे गावात भक्तगणांची गर्दी होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या तीन ते चार दिवसात ठाकुर्ली हनुमान मंदिर परिसर भाविक आणि वाहतूक कोंडीने गजबजून जाण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी या भागात पुरेसे पोलीस तैनात करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. जत्रोत्सवाच्या काळात ठाकुर्ली, चोळे, खंबाळपाडा येथील रहिवाशांच्या घरी प्रसादासाठी विविध भागातून नागरिक येतात. ही सर्व वाहने एकाचवेळी ठाकुर्ली, चोळे भागात येणार आहेत. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडणार आहे.
बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक विभागाने म्हसोबा चौक भागात व्यवस्था करावी. जेणेकरून जत्रेच्या ठिकाणी, हनुमान मंदिराजवळ कोंडी होणार नाही, असे नागरिक सांगतात. या जत्रोत्सवामुळे ठाकुर्ली चोळे, खंबाळपाडा गावात आनंदाचे वातावरण आहे.