वृद्ध दाम्पत्याला फसविणारा भामटा डोंबिवलीमध्ये सक्रिय

मुलाचा विमा हप्ता भरण्याच्या बहाण्याने महिलेला गंडा

मुलाचा विमा हप्ता भरण्याच्या बहाण्याने महिलेला गंडा
डोंबिवलीत सावरकर रस्ता भागात एक तरुण घरातील ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्येष्ठ नागरिक एकटे राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची फसवणूक करण्याचा उद्योग हा तरुण करत असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. बुधवारी दुपारी एक वाजता सावरकर रस्त्यावरील पुष्कराज सोसायटीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेची अशाच एका भामटय़ाने एक हजार रुपयांची फसवणूक केली.
पुष्कराज सोसायटीच्या तळमजल्याला दादा (९१) व कुसुम पांडे (८६) हे वृद्ध दाम्पत्य राहते. बुधवारी दुपारी एक वाजता सुटाबुटातला एक तीस वर्षे वयोगटातला तरुण पांडे यांच्या घरी आला. त्याने दरवाजा बाहेरून सुरुवातीला ‘मी भारतीय जीवन विमा (एलआयसी) मधून आलो आहे. तुमचा मुलगा मिलिंद यांचा साडेसहाशे रुपयांचा एलआयसीचा हप्ता भरणे बाकी आहे. तो जमा करण्यासाठी आलो आहे. तो माझ्याकडे द्या,’ असे तो सांगू लागला. मुलाचे अचूक नाव तरुणाने घेतले असल्याने कुसुम पांडे यांनी त्या तरुणाला घरात घेतले. त्याला आदराने पाणी प्यायला दिले. विमा हप्ता साडेसहाशे रुपये असल्याने तेवढे सुट्टे पैसे नसल्याने कुसुम यांनी एक हजार रुपयांची नोट त्या तरुणाच्या हातात दिली. सुरुवातीला त्याने स्वत:चे खिसे चाचपले आणि सुट्टे पैसे आपल्याजवळ नाहीत. मी बाहेरून सुट्टे करून आणतो, असे सांगून त्याने स्वत:चा भ्रमणध्वनी, साडेसहाशे रुपये घेतले असल्याची बनावट पावती कुसुम यांच्या हातावर टेकवली.
उर्वरित रक्कम विमा एजंट परत करण्यासाठी येईल, म्हणून कुसुम यांनी दरवाजा उघडा ठेवला. अर्धा तास झाला तरी तरुण पैसे परत देण्यासाठी आला नाही. त्यामुळे कुसुम पांडे यांच्या मनात पाल चुकचुकली. त्यांनी धाकटा मुलगा मनोज यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून, एक विमा एजंट घरी आला होता. तो एक हजार रुपये घेऊन गेला, असे सांगितले. त्यानंतर त्या भामटय़ा तरुणाने केलेला फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची पोलीस आणि विमा कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे.

पोलिसांचे आवाहन
दुपारच्या वेळेत कोणीही तरुण दारात विमा हप्ता भरायचा आहे, असे सांगून आला तर खात्री केल्याशिवाय त्याला घरात घेऊ नका. कोणीही विमा एजंट घरोघरी जाऊन विमा हप्ता जमा करीत नाही. त्यामुळे असा कोणी भामटा तरुण आढळल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे किंवा आरडाओरडा करून त्या भामटय़ा तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली करण्याचे, आवाहन करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Robbery case increase in dombivali