एटीएम केंद्रात उपकरण लावून ग्राहकांच्या कार्डाचा डेटा चोरणे आणि पैसे लंपास करणे हा प्रकार नवा नाही. मात्र त्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ग्राहकांचा काही दोष नसताना त्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. वसईत मोठय़ा प्रमाणावर ग्राहकांच्या कार्डाचे क्लोनिंग करून लाखो रुपये हडप केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हॅकरच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्राहकांचा बँकेतील पैसा सुरक्षित आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसईतील एचडीएफसी बँक ग्राहकांच्या एटीएम कार्डाचा गैरवापर करून त्यांच्या खात्यातून लाखो रुपये लंपास केल्याची घटना घडल्याने बँक ग्राहक धास्तावले आहेत. तब्बल पन्नासहून अधिक बँक ग्राहकांच्या खात्यांतील लाखो रुपये लंपास करण्यात आले आहेत. एटीएम कार्डाचे क्लोनिंग करून नवी दिल्लीजवळील गुरगाव येथील एटीएम केंद्रातून हे पैसे काढण्यात आले होते. हा प्रकार नवा नाही. मात्र त्याचे वाढत चाललेले प्रमाण चिंताजनक असून ग्राहकांचे बँकेतील पैसे सुरक्षित आहेत का, यावर प्रश्न निर्माण झाला आहे. कारण सतत या घटना घडत असतात त्याला रोखण्यात बँक आणि पोलीस या दोघांना अपयश येत आहे.

काही वर्षांपूर्वी कुलाबा येथील राज्याच्या महासंचालकांच्या मुख्यालयाबाहेरील एटीएम केंद्रात स्कीमर नावाचे उपकरण लावून पोलीस कर्मचाऱ्यांच्या एटीएम कार्डाचे क्लोनिंग करण्यात आले आणि अनेकांच्या पगारावर डल्ला मारण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकार आजही कुठे ना कुठे सुरू असतात. जेवढे तंत्रज्ञान विकसित होत जाते, त्यापेक्षाही त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारे लोक एक पाऊल पुढे असतात, असे म्हटले जाते. हॅकर हा त्यातलाच एक प्रकार आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना हॅकर असेही म्हटले जाते. तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत ते जगभर धुमाकूळ घालत असतात. त्यासाठी विविध क्लृप्त्या वापरत असतात. एटीएम कार्डाचे क्लोनिंग करणे हा त्यातील एक प्रकार आहे आणि हा प्रकार अत्यंत सोपा आहे. एटीएम केंद्रात उपकरण लावून ग्राहकांच्या कार्डाचा डेटा चोरायचा आणि त्याआधारे बनावट कार्ड बनवून मग पैसे लंपास करायची ही साधी पद्धत. ते रोखणे सोपे असले तरी बँका आणि पोलीस काहीच सक्षम उपाय करत नाहीत हेही तितकेच खरे. चिनी बनावटीचे स्कीमर हे उपकरण बाजारात अवघ्या हजार ते बाराशे रुपयांना मिळते. (अगदी मुंबईच्या मनीष मार्केटमध्येही) हे स्कीमर एटीएम केंद्रातील यंत्रात नकळत लावण्यात येतं आणि मग जे ग्राहक पैसे काढायला येतात त्यांचा डेटा चोरला जातो.

अशा घटना घडल्यानंतर एटीएम केंद्राच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक तैनात करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या, परंतु त्याची कुठेच अंमलबजावणी होताना दिसत नाही. अगदी शहरी भागातील एटीएम केंद्रेही सुरक्षारक्षकाविना असतात. रात्री तेथील सुरक्षारक्षक झोपत असतात. (मुंबई पोलिसांच्या एका उपायुक्तांनी रात्री झोपणाऱ्या सुरक्षारक्षकांविरोधात मोहीमच उघडली होती.) वसईत जी घटना घडली ती शहरातील अंबाडी रोड या मुख्य गजबजलेल्या रस्त्यावर असलेल्या एचडीएफसी बँकेच्या मुख्यालयातील एटीएममध्ये. तिथे २४ तास सुरक्षारक्षक असतात. मग हॅकर शिरले कसे? १५ फेब्रुवारीला ग्राहकांच्या एटीएम केंद्रातील पैसे लंपास करण्यात आले; परंतु त्याआधी चार महिन्यांपूर्वी म्हणजे २० ऑक्टोबर २०१७ रोजी या मुख्यालयातील एटीएम केंद्रात हे स्कीमर बसवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. डोक्यावर टोपी, तोंडाला रुमाल बांधलेली व्यक्ती एटीएम केंद्रात प्रवेश करते आणि स्कीमर लावून जाते, तरी कुणाला कळत नाही. त्या वेळी सुरक्षारक्षक काय करत होते? सीसीटीव्ही कॅमेरे होते तर त्याची निगराणी का केली गेली नव्हती, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर मुख्यालयातील एटीएम केंद्र अशा पद्धतीने हॅक होत असतील तर इतर निर्जन भागांतील एटीएम केंद्रांची काय अवस्था असेल, त्याची कल्पनाच न केलेली बरी.

या घटनेनंतर बँकेने सर्व ग्राहकांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे. पण पैसे गेल्यानंतर ग्राहकांना झालेला मनस्ताप, पोलीस ठाण्यात वाया घालवलेला दिवस, बँका आणि पोलीस ठाण्यात फेऱ्या मारण्यासाठी वाया गेलेला वेळ यांची भरपाई कोण करून देणार? एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ग्राहक एकत्र आल्याने बँकेने तत्परतेने पैसे परत केले (परंतु कार्ड ब्लॉक असल्याने तेही काढता येत नाहीत). मात्र अधूनमधून ग्राहकांचे एटीएम कार्ड अशा प्रकारे क्लोन करून पैसे काढले जातात. तेव्हा त्या ग्राहकांना हक्काचे पैसे मिळवण्यासाठी झगडावे लागत असते. आधी पोलीस हद्दीचा प्रश्न उपस्थित करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात, नंतर मग बँका तांत्रिक कारण देत ग्राहकांना ताटकळवत ठेवतात. ग्राहकांचा काहीच दोष नसताना त्याचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होत असते. ग्राहकांचे बँकेत असलेले पैसे सुरक्षित आहेत, असे ठामपणे आज कुणीही सांगू शकत नाही.

या घटनेपासून बोध घेऊन बँक प्रशासनाने एटीएम केंद्र अधिक सुरक्षित करणे आवश्यक आहे. पोलिसांनीही एटीएम केंद्रांची सुरक्षितता वेळोवेळी पडताळून पाहणे गरजेचे आहे. एटीएम कार्ड अधिक सुरक्षित बनवावे लागणार आहे. खुनी पकडणे सोपे, पण हॅकर पकडणे कठीण असते असे म्हटले जाते. त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोरही मोठे आव्हान या हॅकरनी निर्माण केले आहे.

सुहास बिऱ्हाडे @Suhas_news

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rs 10 lakh fraudulently withdrawn through hdfc bank card cloning in vasai
First published on: 20-02-2018 at 02:28 IST