डोंबिवली – आयुर्मान संपलेल्या, भंगारातील रिक्षांचा वापर करून काही तरूण रिक्षांना कल्याण, डोंबिवलीत नकली वाहन क्रमांक वापरून प्रवासी वाहतूक करत आहेत. या नकली वाहन क्रमांकामुळे एकाच वाहन क्रमांकाच्या दोन रिक्षा एकावेळी कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात धावत आहेत. नकली वाहन क्रमांक असलेल्या बेशिस्त रिक्षा चालकाने वाहतुकीचे नियम तोडला की त्याचा भुर्दंड प्रामाणिकपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना बसत आहे.
गेल्या काही वर्षापासून हा प्रकार कल्याण डोंबिवलीत सुरू आहे. नोकरी, व्यवसाय नसल्याने कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील अनेक तरूण दिवसा, रात्री रिक्षा चालवितात. अशा तरूणांकडे रिक्षा चालविण्याचे परमिट नसते. आरटीओचा बिल्ला नसतो. हे रिक्षा चालक जुनी पुराणी, भंगार अवस्थेमधील आयुर्मान संपलेली एखादी रिक्षा कोठून तरी प्रवासी वाहतुकीसाठी भाड्याने घेतात किंवा मिळवतात. या रिक्षेला आरटीओला अंधारात ठेऊन मनमानीने वाहन क्रमांक देऊन ती रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी वापरतात.
या प्रकारामुळे शहरात एकावेळी दोन वाहन क्रमांकाच्या दोन रिक्षा प्रवासी वाहतूक करतात. यामधील एक रिक्षा भंगार आणि बनावट वाहन क्रमांक असलेली असते. तर, दुसरी रिक्षा आरटीओची विहित परवानगी घेऊन चालक चालवित असतो. नकली वाहन क्रमांक असलेल्या चालकाने वाहतुकीचा नियमभंग केला की त्याची दंडात्मक चलन पावती सरळमार्गी दुसऱ्या रिक्षा चालकाला त्याच्या मोबाईल क्रमांकावर ऑनलाईन माध्यमातून येते. नकली आणि मूळ वाहन क्रमांकामुळे हा गोंधळ उडत आहे. या प्रकाराने सऱळमार्गाने प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक हैराण आहेत.
काही महिन्यापूर्वी डोंबिवली वाहतूक विभागाचे वाहतूक सेवक दिनकर सोमासे यांनी नकली वाहन क्रमांक असलेली एक रिक्षा पकडली होती. हा विषय त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणला होता.
डोंबिवलीतील प्रकार
डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा भागात अनमोल नगरीमध्ये लक्ष्मण कोरगावकर कुटुंबासह राहतात. त्यांची एमएच ०५ बीजी ९२९८ क्रमांकाची रिक्षा आहे. आरटीओ, वाहतुकीचे सर्व नियम पाळून ते डोंबिवलीत प्रवासी वाहतूक करतात. परंतु, कोरगावकर यांच्या रिक्षेला असलेल्या वाहन क्रमांकासारखी नकली वाहन क्रमांक असलेली वाहन पट्टी कल्याणमध्ये एका रिक्षा चालकाने आपल्या रिक्षेला लावली आहे.
ही रिक्षा कल्याणमध्ये चालविली जाते. या नकली वाहन क्रमांक असलेल्या रिक्षा चालकाने वाहतुकीचा नियमभंग केला की त्याची ऑनलाईन दंड पावती चुकी नसताना लक्ष्मण कोरगावकर यांच्या मोबाईलवर येते. आपण कोणताही गुन्हा केला नसताना आपणास वारंवार या दंड पावत्या का येतात. म्हणून याप्रकरणी कोरगावकर यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी नकली बनावट वाहन पट्टी लावून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाचा शोध सुरू केला आहे.
