शहापूर : येथील नामांकीत विद्यालयात मुलींना मासिक पाळी आहे का, हे तपासण्यासाठी बीभत्स प्रकार घडला असून या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुरूवारी येथील पोलिस ठाण्यात येऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. शाळेत घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आणि अमानवी आहे, अशा शब्दात संताप व्यक्त करत याप्रकरणी आम्ही सखोल चौकशी करू आणि आरोपींवर कठोर कारवाई होईल, असेही त्या म्हणाल्या.

शहापूर येथील एका नामांकित शाळेमधील स्वच्छतागृहात रक्त सांडल्याचे दिसल्याने मासिक पाळी कोणत्या विद्यार्थीनीला आली आहे हे तपासण्यासाठी सहावी ते दहावीच्या सव्वाशे विद्यार्थिनींचे गणवेश काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विद्यार्थीनींनी हा प्रकार घरी येऊन अक्षरश: रडत पालकांसमोर कथन केला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर संतापलेल्या पालकांनी शाळा आणि पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात प्राचार्यांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्राचार्या आणि एका कर्मचारी महिलेला अटक केली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासही घाबरत असल्याचा आरोप पालकांनी केला होता.

या प्रकरणी संपुर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या असून या शाळेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुरूवारी येथील पोलिस ठाण्यात येऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. यावेळी पालकही उपस्थित होते. मुलगी वयात येत असताना मासिक पाळीच्या दरम्यान तिला मानसिक बदलावला सामोरे जावे लागते. अशा दिवसात मुली अतिशय संवेदनशील भावना व्यक्त करत असतात. या दिवसात आरोग्याची कशी काळजी घ्यावी, स्वच्छता कशी करावी, कोणता आहार घ्यावा, दुखत असताना डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा, याविषयी माहिती शाळेने द्यायला. विशेष म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापिका महिला असतानाही जो प्रकार घडला, तो निंदनीय, आक्षेपार्ह आणि संताप जनक असल्याचे अध्यक्षा चाकणकर यांनी म्हटले. या गंभीर प्रकारामुळे मुलींचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून त्या शाळेत यायला धजत नसल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेली असून आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय शिक्षण विभागाने देखील काय चुका झाल्या आहेत, त्या सर्व प्रकरणाची कायद्याच्या चौकटीत राहून चौकशी करावी. हे करत असताना विदयार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना चाकणकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या. या शाळेमध्ये अनेक उणीवा असून सखी सावित्री समिती स्थापन झालेली नाही. पालक शिक्षक संघटनेमध्ये काय चर्चा होते, याच्या नोंदी नाहीत. तक्रार निवारण समिती नाही, अशा उणीवा असल्याचे शिक्षण विभागाने निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आम्ही सखोल चौकशी करू आणि आरोपींवर कठोर कारवाई होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर मुलींचे समुपदेशन करण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्राचार्या व महिला कर्मचारीला बुधवारी अटक केली होती. आज अन्य तीन शिक्षिकांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. तर प्राचार्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, बाल कल्याण समिती, जिल्हास्तरीय महिला दक्षता समिती व पालक यांची संयुक्त बैठक दमानी शाळेत शुक्रवारी बोलावण्यात आली असून त्यामध्ये पालकांच्या तक्रारींवर कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.