संमेलनात डोंबिवलीच्या साहित्यिकांचाच विसर?

डोंबिवलीमध्ये अनेक साहित्यिक मंडळींचे वास्तव्य आहे.

  • संयोजनात सहभागी करून न घेतल्याने नाराजी
  • अनेक साहित्यिकांना अद्याप निमंत्रण नाही

अवघ्या दहा दिवसांवर साहित्य संमेलन येऊन ठेपले तरी, अद्याप आपल्याला साधे कार्यक्रमातील सहभागाबद्दल नाहीच, पण निमंत्रित किंवा संमेलनातील सहभागाबद्दल विचारणा न केल्याने डोंबिवलीतील अनेक लेखक मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे. गावात संमेलन भरत आहे म्हणून एक आपुलकी आहे, पण स्वत:हून संमेलन कार्यालयात जाऊन आम्हालापण सहभागी करून घ्या, म्हणून कसे सांगायचे, असा प्रश्न या लेखक मंडळींनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे, स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी ‘संमेलनात सर्वाना सहभागी करून घेण्यात येत आहे. कोणीही लेखक, साहित्यिक संमेलनापासून दूर राहणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे,’ असे सांगितले.

डोंबिवलीमध्ये अनेक साहित्यिक मंडळींचे वास्तव्य आहे. त्यामुळे शहरात एरवीही साहित्याशी संबंधित वेगवेगळे उपक्रम होत असतात. मात्र, साहित्य संमेलन होत असतानाही या शहरातील अनेक साहित्यिक मंडळी त्यापासून दूर आहेत. संमेलन आयोजकांकडून कोणतीही विचारणा न झाल्याने तसेच त्यांच्याकडून निमंत्रण न आल्याचे कारण या साहित्यिक मंडळींनी दिले आहे. वेदांचे अनुवादकार वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांच्याकडे कोणतीही विचारणा झालेली नाही. शासनाच्या दर्शनिका विभागातून निवृत्त झालेले नि. रा. पाटील यांनी १२ पुस्तके लिहिली आहेत. त्यांनाही संमेलनासाठी आमंत्रण नाही. लेखिका व ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुलभा कोरे, मनीषा सोमण यांना संमेलन सहभागाबद्दल विचारणा नाही. कोरे यांना कविसंमेलनात एक कवी म्हणून निमंत्रित असल्याचे पत्र त्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात आले आहे. माध्यम क्षेत्रातील लेखक, पुस्तकांचे लेखक, संतसाहित्य अभ्यासक दिवंगत दिवाकर घैसास, दिवंगत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक इसाक मुजावर यांचेही विस्मरण संमेलनाच्या माहिती स्थळावर झाले आहे. दरम्यान, संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी असे काहीच घडले नसल्याचे सांगितले. ‘शहर परिसरतील सर्व लेखक, कवी, लिहित्या मंडळींना आपण संमेलनाला बोलविणार आहोत. त्यांचा सक्रिय सहभाग असेल या दृष्टीने संमेलन संयोजक प्रयत्नशील आहेत,’ असे ते म्हणाले.

डोंबिवलीतील लेखकांना संमेलन संयोजनात सहभागी करून घेणे आवश्यक होते. बाहेरचे लोक आम्हाला संमेलनात तुमचा सहभाग कोठे आहे, म्हणून विचारतात. तेव्हा वाईट वाटते. गावात संमेलन असून आपण कोठेच नाहीत, याची एक प्रवचनकार, प्रचारक, लेखक म्हणून खंत वाटते.

डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रवचनकार व लेखक

संमेलनाचे वातावरण दिसत नाही. हा एकटय़ा संयोजकांचा दोष नाही. साहित्याविषयीची समाजाची भावनात्मकता लोप पावत चालली आहे. साहित्य संमेलन हा साहित्यिकांचा उत्सव असतो. तेथे रसिक, साहित्यिक, सारस्वताला साहित्याचा मनसोक्त, पैसे न भरता स्वाद घेता आला पाहिजे. बिनपैशातून, भरगच्च उंची पाहुणे न आणता मोठय़ा उंचीचे संमेलन साजरे होऊ शकते, पण आता परिस्थिती बदलली आहे.

वामन देशपांडे, साहित्यिक

६४ वर्षे लिखाण करून आपण ५८ पुस्तके लिहिली आहेत. पहिल्यापासूनची संमेलने अनुभवली आहेत. बाल साहित्य हा माझ्या आवडीचा विषय आहे. आपल्या आवडीच्या विषयावर संमेलनात एखाद्या परिसंवादाचे नेतृत्व करण्याची इच्छा होती. पण तसे काही दिसत नाही. संमेलन व्यासपीठावर आपली पुस्तके प्रकाशित करण्याची इच्छा होती. त्यासाठी पाचशे रुपये भरावे लागणार म्हणून तो विचार सोडून दिला आहे.

लीला शहा, लेखिका

संमेलन डोंबिवलीत होणार हे तीन महिन्यांपूर्वी जाहीर झाले. त्या वेळी डोंबिवली, कल्याण परिसरात किती लेखक, साहित्यिक राहतात. अशी माहिती संकलित करणे आवश्यक होते. म्हणजे एकही लेखक संमेलन संयोजनापासून दूर राहिला नसता. इच्छाशक्तीचा अभाव यामध्ये दिसला.

दुर्गेश परूळकर, लेखक

ठाणे जिल्ह्य़ात १७५ पुस्तके लिहिणारा लेखक म्हणून माझे नाव आहे. यामधील १५० पुस्तके क च्या बाराखडीपासून सुरू झाली आहेत. संमेलन डोंबिवलीत होतेय म्हणून आनंद आहेच, पण ते आपल्या गावात भरतेय म्हणून सहभागाबद्दल विचारणा होईल, अशी अपेक्षा होती. अद्याप एका शब्दाने आपल्याशी कोणी संपर्क केलेला नाही.

अरुण हरकारे, लेखक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sahitya sammelan issue