प्रमाणापेक्षा अधिक खोदकाम होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागात दोन कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यापासून या कूपनलिका खोदण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रमाणापेक्षा अधिक खोल खोदल्याने तसेच कल्याण, डोंबिवली परिसर हा खाडीकिनारी येत असल्याने अनेक कूपनलिकांना खारे पाणी लागत असल्याचे दिसून येत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने घाईघाईने कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याचा काही उपयोग होत नसल्याबाबत अनेक नगरसेवक खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत.
पालिका हद्दीत ५० ते ५५ टक्के पाणीकपात आहे. रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने, शहरवासीयांची पाण्याची तहान भागविण्यासाठी पालिकेने गेल्या दोन महिन्यापूर्वी पालिका हद्दीतील १२२ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक प्रभागात दोन कूपनलिका खोदण्यात आल्या तर रहिवाशांना पाण्याचा स्रोत उपलब्ध होईल आणि पाणीटंचाईचा ओरडा कमी होईल, हा यामागचा पालिकेचा उद्देश होता.
पालिकेची कंत्राटे ही पालिकेतील नगरसेवकांनीच आपल्या मोहऱ्यांना पुढे करून घ्यायची असतात. त्याप्रमाणे कूपनलिका खोदण्याचे काम ‘पालिकेची तिजोरी ही आपलीच वंशपरंपरागत तिजोरी आहे’ अशा आविर्भावात वापरणाऱ्या एका पोरकट नगरसेवकाने आपल्या समर्थकांना मिळवून दिले. या नगरसेवकाचा कूपनलिका खोदण्याचा व्यवसाय नसताना, या नगरसेवकाने भाडय़ाने यंत्रणा आणून ते कंत्राट स्वत:च्या पदरात पाडून घेतले असल्याची पालिकेत चर्चा आहे.
या कूपनलिका १०० ते १५० फूट खोलीपर्यंत मर्यादित ठेवल्या तर मुबलक चांगले पाणी रहिवाशांना उपलब्ध होऊ शकते, असे भूजल क्षेत्रातील एका जाणकाराने सांगितले.
रहिवाशांना पाणी मिळण्यापेक्षा कूपनलिकांच्या माध्यमातून वाढीव देयक पालिकेतून उकळणे एवढाच काहींचा धंदा असल्याने, कूपनलिका खोदण्याचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याचे एका जाणकार नगरसेवकाने खासगीत सांगितले. काही वजनदार नगरसेवकांच्या प्रभागात दोनच्या ऐवजी तीन ते चार कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत.
कूपनलिका या दिलेल्या नियमानुसार खोदण्यात येत आहेत. सगळ्याच कूपनलिकांना खारे पाणी लागत नाही. अगदी खाडीकिनारी, शहराच्या कोपऱ्यावरील भागात अशी परिस्थिती असते. बाकी कूपनलिकांचा वापर रहिवासी घरगुती वापरासाठी करीत आहेत. ज्या कूपनलिकेतील पाण्याबाबत तक्रारी येतात. तेथील पाण्याचे नमुने तपासले जातात. रहिवाशांना पाणी उकळून पिण्यासाठी पालिकेने यापूर्वीच आवाहन केले आहे, असे पालिका सूत्राने सांगितले.
अतिलोभामुळे योजना फसली
कूपनलिका या दीडशे ते दोनशे मीटपर्यंत खोदायच्या आहेत. फुटाप्रमाणे कूपनलिका ठेकेदाराला पालिका देयक अदा करणार आहे. या कूपनलिकांच्या पाण्यातूनही दौलतजादा करायचा असल्याने, कूपनलिका दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक खोल खणून वाढीव देयक वसुलीची गणिते ठेकेदारांकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. कल्याण, डोंबिवली शहर खाडीकिनारी असल्याने या भागात किमान १०० फुटांवर कूपनलिकांना पाणी लागते. हे पाणी पिण्यायोग्य व घरगुती वापरायोग्य असते. जुन्या सोसायटय़ांना अशाच प्रकारच्या कूपनलिका आहेत. या कूपनलिका शंभर फूट खोलीच्या आहेत. परंतु, शंभर फुटाच्यावर खोदाई केल्यानंतर लागणारे पाणी खाडीकिनाऱ्यामुळे खारट असते. वाढीव देयक मिळण्याच्या आमिषाने कूपनलिकांची खोदाई होत असल्यामुळे कूपनलिका खोदण्याचा मूळ उद्देश सफल होत नाही.