tv06महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या हत्येची घटना सर्व क्रीडा प्रेमींना चटका लावून गेली होती. २००९ मध्ये १५ जानेवारीला कराडमध्ये दिवसाढवळ्या संजय पाटील यांच्यावर बंदुकीच्या १५ फै ऱ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचा अत्यंत शिताफीने तपास करून सातारा पोलिसांनी सलीम शेख उर्फ साल्या चेप्या या सराईत गुन्हेगाराला अटक केली. खून, दरोडा, जबरी चोरी असे २६ गंभीर गुन्हे त्याच्या नावावर होते. गुन्ह्य़ाच्या तपासातील त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. आरोपीवर न्यायालयीन सुनावणी सुरू असताना ३ मे २००९ रोजी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी साताऱ्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. त्यावेळी तिथे त्याच्यावर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सुदैवाने आरोपी वाचला. मात्र, त्याची गुन्हेगारी पाश्र्वभूमी पाहता त्याचे बरेचसे शत्रू त्याच्या जीवावर उठले होते. हे लक्षात घेऊन न्यायालयाने सुनावणीदरम्यान जेव्हा जेव्हा आरोपीला तुरुंगाबाहेर आणले जाईल तेव्हा त्याला पुरेशा प्रमाणात संरक्षण देण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले.
त्यानंतर पाच महिन्यांनी आरोपी शेखला सुनावणीकरता अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्याच्या संरक्षणासाठी कराड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनमंत रामचंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नेताजी गायकवाड आणि पोलीस हवालदार बळवंत चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली. सुनावणीच्या वेळी शेखला सरकारी वकिलाच्या कार्यालयासमोर नेत असतानाच उजव्या बाजूने एक अनोळखी इसम बाजूच्याच पार्किंगमधून अचानक पुढे आला. त्याच्या हालचाली पाहून शिंदे यांनी त्याला हटकले आणि थांबवले. पोलिसांनी अचानक अडवल्यामुळे गोंधळलेल्या त्या इसमाने लपवलेले रिव्हॉल्वर काढून थेट आरोपी सलीम शेखच्या दिशेने रोखले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीच्या संरक्षणाकरता पोलिसांनी त्याला चारी बाजूंनी कव्हर के ले. त्याच वेळी त्या अनोळखी इसमाने गोळीबार सुरू केला. त्याच्या गोळीने साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाडांच्या पोटाचा वेध घेतला. मोठय़ा प्रमाणावर पोटातून रक्तस्त्राव होत असतानाही गायकवाड यांनी त्या इसमाची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. हवालदार चव्हाण यांनी शिताफीने मागे जात त्याला मिठीत पकडले. तर शिंदे यांनी त्या इसमाच्या हातावर जोरदार प्रहार करत त्याचे रिव्हॉल्वर जमिनीवर पाडले. आरोपीने हवालदार चव्हाण यांची पकड सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्याने शिंदेंवर समोरून हल्ला चढवला. त्याच्या दणकट हाताचा कोपरा शिंदेंच्या छातीत लागला आणि त्यामुळे त्यांच्या छातीच्या बरगडय़ा फ्रॅ क्चर झाल्या. या सगळ्या परिस्थितीत या तीन शूर लढवय्या पोलिसांनी दोन हात करत न्यायालयाच्या आवारातच हल्लेखोर दीपक भीमराव पाटील याला जेरबंद केले.
न्यायालयीन कैदेत असलेल्या आरोपीच्या संरक्षणासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करताना कर्तव्यनिष्ठेने आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड आणि हवालदार चव्हाण यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे.
डॉ. रश्मी करंदीकरपोलीस उपायुक्त, ठाणे शहर (वाहतूक शाखा)