मुंब्रा, कोपर, दिवा, गायमुखच्या खाडीत रेती माफियांचा धुमाकूळ; प्रशासनही हतबल
ठाणे, मुंब्रा, कल्याणच्या खाडीत रेतीचा अर्निबध असा उपसा करणाऱ्या माफियांविरोधात वेळोवेळी कारवाई सुरू असल्याचे चित्र जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने रंगविले जात असले तरी गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या मुसळधार पावसातही मुंब्रा, कोपर, दिवा, गायमुखच्या खाडीत रेती माफियांचा अक्षरश धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र दिसून आले. पावसाचा जोर मोठा असल्याने जिल्हा प्रशासनाची पथके खाडीकिनारी फिरकण्याची शक्यता कमी असल्याचे लक्षात येताच माफियांनी शनिवार सकाळपासूनच उपशासाठी जोर लावला होता.
विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेल्या ठाणे जिल्ह्य़ात बेकायदा स्वरूपात सुरू असलेला रेती उपसा हा पर्यावरणप्रेमींसाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरला आहे. गेल्या दोन दिवसात ठाणे, डोंबिवली तसेच आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या काळात सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडणेही टाळत असताना गायमुख, दिवा, कोपरच्या खाडीत रेती माफियांच्या बोटींचा वावर पाहून पर्यावरणप्रेमी चक्रावल्याचे चित्र होते. मुसळधार पावसाचा आधार घेऊन खाडीकिनारी रेती उपसा वाढतो, अशी माहिती ठाणे आणि कल्याण डोंबिवली परिसरात काम करणारे पर्यावरणप्रेमी सुभाष पत्की यांनी ठाणे लोकसत्ताला दिली. जिल्हा प्रशासनाची कारवाई सातत्याने सुरू असली, तरी डॉ. जोशी यांच्या काळात ज्याप्रमाणे माफियांचे अवसान गळाले होते, तसे चित्र आता दिसत नाही, अशी प्रतिक्रिया दिवा तसेच आसपासच्या गावांमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली. मुंब््रयाच्या खाडीत रेती उपसा करणाऱ्या बोटी नियमित दिसून येतात, अशी माहिती नियमित प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन महिन्यांत पावणेतीन कोटींचा दंड
गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत अवैधरीत्या रेती उपसा करणाऱ्या ८९६ गाडय़ा पकडून त्यांच्याकडून २ कोटी ७२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या अवैध व्यवहारात सहभागी असणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती रेती गट शाखेने दिली. केवळ जुलै महिन्यातच आतापर्यंत २२२ गाडय़ा पकडून त्यांच्याकडून ४८ लाख रुपये दंडवसुली झाली आहे. जुलै महिन्यात एकंदर ८९३ ब्रास रेती जप्त करण्यात आली असून त्याची किंमत ६२ लाख ५१ हजार रुपये इतकी होते. भिवंडीमधून ५५१ ब्रास, तर ठाण्यातून ३४२ ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. अशा रीतीने गेल्या महिन्यात १ कोटी ६२ लाख ५१ हजार रुपये किमतीचा ९ हजार ९८५ ब्रास रेतीसाठा जप्त झाला आहे.तसेच केलेल्या कारवाईत २ सक्शन पंप आणि १३ गाडय़ा ताब्यात घेण्यात आल्या, असे रेती गट शाखेचे तहसीलदार विनोद गोसावी यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे परिस्थिती प्रतिकूल असूनही त्याची पर्वा न करता प्रशासनाची पथके रेती माफियांना रोखण्यासाठी धडपड करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

प्रशासनाची कारवाई निषभ्र
ठाणे जिल्ह्य़ात विविध विकासकामांसाठी नेहमीच प्रसिद्धी माध्यमांतून चर्चेत राहिलेले तत्कालीन जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांच्या काळात तर रेती माफियांचा खाडीकिनाऱ्यांवर अक्षरश धुडगूस सुरू होता. त्यानंतर डॉ.अश्विनी जोशी यांनी मात्र सतत सुरू केलेल्या कारवायांमुळे रेती माफियांना वचक बसला. रेती माफिया आणि तहसीलदार कार्यालयांमधील ठरावीक कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याची चर्चा लक्षात घेऊन डॉ. जोशी माफियांविरोधी मोहिमेचे स्वत नेतृत्व करत. भिवंडी तसेच आसपासच्या परिसरात खाडीकिनारी भराव टाकून सुरू असलेली बेकायदा बांधकामे, कोपर, दिव्याच्या खाडीतील रेती उपसा करणारे माफियांचे कंबरडे मोडले होते. त्यांची बदली झाल्यानंतर आनंदी झालेल्या माफियांनी फटाके फोडून आनंद साजरा तर केलाच शिवाय मोठय़ा प्रमाणावर बोटी उपशासाठी खाडीत सोडल्या. त्यामुळे सातत्याने टीका होऊ लागल्याने खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने दिवा, कोपर, गायमुख, भिवंडी यासारख्या पट्टय़ात जोरदार कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे माफियांना अटकाव बसला आहे, असा दावा जिल्हा प्रशासनाच्या प्रसिद्धी विभागामार्फत सातत्याने केला जात असला, तरी गेल्या पंधरवडय़ापासून सुरू असलेल्या पावसातही माफिया खाडय़ांमध्ये वावरताना दिसू लागल्याने या कारवाईतील फोलपणा उघड झाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sand extraction during heavy rain in thane district
First published on: 02-08-2016 at 00:50 IST