महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये १२५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यामध्ये शिवसेना-भाजपा युतीने निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांनाच संधी देण्यात आली आहे. ठाणे शहर मतदारसंघासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली असतानाच आता भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान आमदार संजय केळकर यांनाच तिकीट दिले आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसैनिक नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे शहर मतदारसंघामध्ये आता भाजपा विरुद्ध शिवसेना असा छुपा संघर्ष दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेने ठाणे शहर मतदारसंघासाठी आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली होती. शिवसेनेच्या गोटातील या हालचालींमुळे सावध झालेल्या ठाण्यातील भाजप नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघाची अदलाबदल करू नये यासाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे आग्रह धरला होता. अगदी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामार्फत शिवसेनेचे मनसुबे हाणून पाडण्याचे प्रयत्न भाजपाने केला. या प्रयत्नांना यश आले असून ठाण्याची जागा पुन्हा भाजपालाच देण्यात आली आहे.

शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपने मोठय़ा मताधिक्याने विजय मिळविला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही भाजपचे शहर मतदारसंघातून शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळविल्या. नौपाडा, पाचपाखाडी यांसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली. वागळे इस्टेट, वर्तकनगर यांसारख्या पट्टयात शिवसेनेने मोठा विजय मिळविल्याने ठाणे महापालिकेत या पक्षाची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली असली तरी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात सातत्याने होणारी पिछेहाट शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे युतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ पुन्हा पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र जागावाटपामध्ये शिवसेनेला ठाणे शहर मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपासाठी सोडावा लागल्याचे चित्र दिसत आहे.

शिवसेनेने ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता. भाजपच्या ठाण्यातील नेत्यांनी सावध भूमिका घेत महापालिका हद्दीत भाजपच्या ताब्यात असलेली विधानसभेची एकमेव जागा शिवसेनेला देता कामा नये यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांना पाठवला होता. भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीशी ठाण्यात लढत कायम ठेवायची असेल तर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असायलाच हवा, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. ठाणे शहर ही जागा शिवसेनेला दिल्यास संपूर्ण महापालिका क्षेत्र शिवसेनेला आंदण दिल्यासारखे झाले असते आणि हे ठाण्यातील भाजपा नेत्यांनाही मान्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका बडय़ा नेत्याने दिली होती.