भूखंड देण्याच्या प्रस्तावाचे आयुक्तांकडून समर्थन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेचा सुमारे चार एकर क्षेत्रफळाचा भूखंड जगप्रसिद्ध संकरा रुग्णालयास नाममात्र भाडेपट्टय़ावर देण्याच्या प्रस्तावाचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी समर्थन केले. या प्रस्तावात सुमारे २५ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आरोप त्यांनी खोडून काढला. तसेच ठाण्यात जगप्रसिद्ध नेत्रालय आणि प्रशिक्षण केंद्र उभे रहावे किंवा नाही, हे आता ठाणेकरांनीच ठरवावे, असे सांगत जयस्वाल यांनी हा प्रस्ताव आता ठाणेकरांच्या कोर्टात ढकलला आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या ठाण्यातील प्रवेशाचे भवितव्य आता ठाणेकरांच्या हाती आहे.

संकरा नेत्रालयाने ठाणे शहरात रुग्णालय उभारणीसाठी महापालिकेकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने एक रुपया नाममात्र भाडेपट्टय़ावर चार एकरचा भूखंड देण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यास सर्वसाधारण सभेने नुकतीच मान्यता दिली. या प्रस्तावानुसार, रुग्णालयात ४० टक्के शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत आणि देशातील सर्वोत्तम संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. महापालिकेने रुग्णालयासाठी देऊ केलेल्या भूखंडाची किंमत शंभर कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या प्रस्तावामध्ये २५ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. तसेच त्यासंबंधीचे मोठे फलक शहरात लावल्याने हा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

दरम्यान, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संकरा नेत्रालयाबाबत केलेले आरोप खोडून काढले. तसेच अशा तथ्यहीन बेछूट आरोपांमुळे मन व्यथित झाल्याचे सांगत शहरात नेत्रालय हवे की नको, याचा निर्णय आता ठाणेकरांनीच घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. या रुग्णालयासंबंधी ठाणेकरांनी आपल्या प्रतिक्रिया महापालिकेस कळवाव्यात. तसेच नागरिकांची मागणी असेल तरच हा प्रस्ताव पुढे पाठविण्यात येईल. त्याचप्रमाणे या प्रस्तावात अर्थकारण झाल्याचे ठाणेकरांना वाटत असेल तर हा प्रस्ताव कार्यवाहीसाठी पुढे पाठविला जाणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

 

शिवसेनेकडून प्रस्तावाचे स्वागत

हा विरोधकांचा दुटप्पीपणा असून राष्ट्रवादी चांगल्या कामात खोडा घालत आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आणलेला हा प्रस्ताव चांगला असून शिवसेना या प्रस्तावाच्या बाजूने उभी आहे. ठाणेकरांना जगप्रसिद्ध नेत्रालय आणि प्रशिक्षण केंद्र मिळणार असेल तर हरकत काय आहे. कुणाचे काही आर्थिक हितसंबंध पोहचले गेले नाहीत म्हणून अशा प्रकारचे आरोप होत तर नाहीत ना, हे सुद्धा पाहणेही गरजेचे आहे, असे स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankara eye hospital decision to take thane people
First published on: 06-10-2015 at 04:04 IST