पुढच्या वर्षीपासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरणार
इंग्रजी माध्यमातील शिक्षणाकडे विद्यार्थी-पालकांचा ओढा वाढत चालला असतानाच दुसरीकडे चांगल्या दर्जाचे आणि उच्च शिक्षणासाठी अधिक पूरक समजल्या जाणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांना अधिक पसंती मिळू लागली आहे. याचा मोठा परिणाम राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी) मराठी शाळांमधील पटसंख्येवर होऊ लागला आहे. नेमकी हीच बाब हेरून गेल्या ६० वर्षांपासून ठाणे शहराच्या शैक्षणिक विश्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या सरस्वती सेकंडरी या मराठी माध्यमाच्या शाळेने आता इंग्रजी माध्यमाचे वर्गही भरवण्याचे ठरवले आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून या शाळेमध्ये मिनी आणि छोटा शिशु असे इंग्रजी माध्यमाचे दोन वर्ग सुरू होणार असून ‘सरस्वती’ची ही वाटचाल ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमावर आधारित असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नौपाडय़ातील गोखले रोडवरील या शाळेत सध्या बालवर्ग ते दहावी इयत्तांमध्ये सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ वाढू लागल्यानंतर सरस्वती शाळेत काही वर्षांपूर्वी आठवीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले होते. त्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढू लागल्यानंतर पाचवीपासूनचे सेमी इंग्रजी वर्ग शाळेत भरवले जाऊ लागले. सध्या प्रत्येक इयत्तांमधील चार तुकडय़ांपैकी तीन तुकडय़ा अर्धइंग्रजी माध्यमाच्या आणि अवघी एक तुकडी मराठी माध्यमाची आहे. मात्र इंग्रजीच्या रेटय़ामुळे नाईलाजाने नौपाडा, चरई, पाचपाखाडी परिसरातील माजी विद्यार्थी त्यांच्या मुलांना ‘आपली शाळा’ सोडून तुलनेने लांब ठिकाणी असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू लागले आहेत. त्यातही अनेक पालकांचा हल्ली त्यांच्या मुलांनी सीबीएसई बोर्डाच्या शाळेत जावे असा आग्रह असतो. शैक्षणिक क्षेत्रातील ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ‘सरस्वती’नेही माध्यम म्हणून इंग्रजीचा पर्याय पालकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या शैक्षणिक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाचे मिनी आणि छोटा शिशू हे दोन वर्ग सरस्वती शाळेत सुरू होणार असून त्यात अनुक्रमे तीन आणि चार वर्षे वयाच्या प्रत्येकी २५ मुलांना प्रवेश दिला जाईल. सरस्वतीच्या या इंग्रजी माध्यमांच्या वर्गात अगदी पहिल्या इयत्तेपासून संपूर्णपणे अद्ययावत पद्धतीच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या संदर्भात माजी विद्यार्थी, पालक तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी सरस्वती शाळेत लवकरच एक सभा आयोजित केली जाणार आहे.
इंग्रजी माध्यम स्वीकारले असले तरी सरस्वती शाळेतील महाराष्ट्रीय सांस्कृतिक वातावरण आणि मराठी बाणा कायम राहणार आहे. तसेच इंग्रजी माध्यम सुरू होणार असले तरी त्यामुळे मूळच्या मराठी माध्यमाच्या वर्गावर अजिबात अन्याय होणार नाही. सध्या ‘सीबीएसई’ बोर्डाच्या शिक्षणासाठी येथील मुलांना घोडबंदर रोडवरील दूरवरच्या शाळांमध्ये जावे लागते. आता त्यांना जुन्या ठाण्यातही पर्याय उपलब्ध होईल.
-सुरेंद्र दिघे, विश्वस्त, सरस्वती ट्रस्ट