श्वान पथकातील ‘नील’ला सहकारी लाभणार

दलातील श्वान पथकात ‘नील’ नावाचा एकमेव श्वान असल्यामुळे त्याला ठाणे ते बदलापूपर्यंतच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून तसेच घरफोडीच्या गुन्ह्य़ांच्या तपासासाठी जावे लागते. दिवसभरात चार ते पाच ठिकाणी तपासासाठी जावे लागत असल्यामुळे त्याची पुरतीच दमछाक होते. त्यामुळे आता ‘नील’च्या मदतीला ‘साशा’ नावाची डॉबरमॅन जातीची मादी दाखल होणार आहे. येत्या सप्टेंबरअखेपर्यंत ती प्रशिक्षण घेऊन ठाणे पोलिसांच्या श्वान पथकात दाखल होणार आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अबंरनाथ आणि बदलापूर अशी शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांसाठी ठाणे पोलिसांची पाच परिमंडळे आणि त्याअंतर्गत ३३ पोलीस ठाणी येतात. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणारे खून तसेच घरफोडीच्या गुन्ह्य़ांचा छडा लावण्याचे काम स्थानिक पोलिसांकडून करण्यात येते. तसेच यापैकी काही गुन्ह्य़ांचे गांर्भीय लक्षात घेऊन ठाणे गुन्हे अन्वेषण शाखाही अशा गुन्ह्य़ांचा समांतर तपास करते. याशिवाय, पोलिसांच्या पथकांना अशा गुन्ह्य़ातील आरोपींचा माग काढण्यासाठी तसेच तपासाची दिशा ठरविण्यासाठी अनेकदा घटनास्थळी आणलेल्या श्वानाकडून महत्त्वाचे धागेदोरे मिळतात. यामुळे खून तसेच घरफोडीच्या प्रत्येक गुन्ह्य़ाच्या घटनास्थळी श्वानाला नेण्यात येते. सध्या ठाणे पोलीस दलातील श्वान पथकात ‘नील’ नावाचा एकमेव श्वान आहे. ठाणे ते बदलापूपर्यंतच्या ३३ पैकी चार ते पाच पोलीस ठाण्यांमध्ये त्याला दररोज तपासासाठी जावे लागते. त्याच्यासोबत या विभागाचे अधिकारी तसेच त्याचे श्वान हाताळणारे कर्मचारी असतात. काही वेळेस नवी मुंबई, ठाणे ग्रामीण या भागातील श्वानाची प्रकृती ठिक नसेल तर त्या भागातही त्याला तपासाकरिता जावे लागते. यामुळे ‘नील’ याच्यासोबतच अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची दमछाक होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी ‘नील’ च्या मदतीला ‘साशा’ नावाची डॉबरमॅन जातीची मादी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तिची श्वान पथकासाठी निवड करण्यात आली असून त्यावेळी ती तीन महिन्यांची होती. गेल्या सहा महिन्यांपासून श्वान हाताळणारे कर्मचारी तिला प्रशिक्षिण देत होते. आता या महिन्यापासून तिला पुढील प्रशिक्षणासाठी पुण्यातील शिवाजीनगर येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले आहे. सप्टेंबरअखेपर्यंत प्रशिक्षण आटोपून ती ठाणे पोलिसांच्या श्वान पथकात दाखल होईल, अशी माहिती श्वान पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राणे यांनी दिली.