दारूच्या नशेत घरातील सत्यनारायणाच्या पूजेला बसण्यास मज्जाव केल्याने चार जणांनी मिळून एकाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना उल्हासनगर मध्ये समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर मधील गायकवाड पाडा येथे अशोक पवार आणि दीपक पवार हे राहतात. मागील सहा दिवसांपूर्वी अशोक आणि दीपक यांच्या उल्हासनगर मधील नातेवाईकांच्या घरी गणेशोत्सवा निमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात गेले होते. या पूजेसाठी अशोक आणि दीपक दोघेही पूजेला गेले होते.

यावेळी त्यांच्या नातेवाईकांच्या परिचयाचा असलेला राहुल गायकवाड हा २२ वर्षीय तरुण दारूच्या नशेत पूजेला आला. तसेच नशेत असल्याने गणेश मूर्तीच्या शेजारी जाऊन बसला. यामुळे दीपक पवार याने राहुल याला पुजेपासून आणि गणेश मूर्तीपासून दूर बसण्यास सांगितले. त्यावेळी राहुल तेथून निघून गेला. मात्र त्याचा राग डोक्यात ठेऊन राहुल आणि त्याच्या तीन मित्रांनी अशोक आणि दीपक यांना सोमवार, १२ सप्टेंबरच्या रात्री गायकवाड परिसरात रात्री नऊ वाजता गाठले. यावेळी पूजेला का बसू दिले नाही असा सवाल करत दिपकला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

हेही वाचा : अमृता फडणवीसांना फेसबुक युजरकडून शिवीगाळ, आयपी अ‍ॅड्रेस तपासला असता धक्कादायक माहिती समोर, ठाण्यातूनच एक…

तर खिशातील चाकू काढत अशोकच्या पोटावर वार केला. माझ्या नादी लागू नकोस नाहीतर ठार मारीन अशी धमकीही दिली. तसेच यावेळी आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनां देखील राहुल याने चाकूचा धाक दाखवत माझ्या जवळ कोणीही यायचे नाही असे सांगून तेथून पोबारा केला. या घटनेत अशोक यांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी अशोक पवार यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी राहुल आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांविरोधात शस्त्र बाळगणे, गंभीर इजा करणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.