डोंबिवलीकरांनी सुरू केलेली पहिली शाळा म्हणून टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळकनगर विद्यालयाचा उल्लेख होतो. याच टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाने सामाजिक बांधिलकी लक्षात घेत शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध उपक्रम हाती घेतले. त्यातीलच एक सावरकर अभ्यास मंडळ. मंडळाच्या वतीने नुकताच सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. त्यानिमित्ताने अभ्यास मंडळाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीचा आढावा..

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी वयाच्या ८३व्या वर्षी म्हणजेच २६ फेब्रुवारी १९६६ रोजी ‘आत्मार्पण’ केले. त्यांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण केवळ राष्ट्रासाठी वेचला. विपुल ग्रंथलेखन केले. विविध प्रकारच्या साहित्यातून त्यांनी देश बांधवांच्या मनात राष्ट्रभक्ती जागवली. प्रतिकूलतेवर मात करण्याची आणि पौरुषत्वाची वृत्ती जोपासायला प्रवृत्त करणारे अभिजात वाङ्मय निर्माण केले. त्यांच्या या महान कार्याची नि साहित्याची तरुणांना ओळख व्हावी, या उद्देशाने दिवंगत बापूसाहेब जपे, ज.ल.पटवर्धन आदी ज्येष्ठ सावरकर अनुयायांनी १९७२ मध्ये स्वा. सावरकर अभ्यास मंडळाची स्थापना केली. तरुणांनी सावरकर वाङ्मयाचा व त्यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून त्याचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी व्हावा, या त्यामागचा उद्देश होता.
सावरकरांच्या साहित्याचे वाचन व्हावे, त्यांच्या साहित्याची देवाण-घेवाण व्हावी. विशेष करून तरुणांनी यात पुढाकार घ्यावा, यासाठी हे मंडळ कार्यरत आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मंडळाची मासिक बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत सभासद अनेक विषयांवर चर्चा करतात. स्वा. सावरकरांच्या अनेक पैलूंवर सभासद आपले विचार व्यक्त करतात. अनेक वेळा विद्यार्थ्यांचाही यात सहभाग असतो. शहरातील तरुणांनी अधिकाधिक संख्येने या अभ्यास मंडळात आपली उपस्थिती लावावी अशी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची अपेक्षा असल्याचे मंडळाचे कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे सांगतात. मंडळाची स्थापना
करण्यात आल्यानंतर विविध कार्यक्रम या मंडळाच्या अंतर्गत आयोजित केले जात असत. अशाच एका कार्यक्रमात सुधीर फडके यांनी वीर सावरकर चित्रपट निर्मितीचा संकल्प टिळकनगर शाळेच्या वास्तूत १९८५ मध्ये सोडला. त्यांच्या या संकल्पाला आर्थिक मदत म्हणून सावरकर अभ्यास मंडळाच्या सदस्या
लता मुकादम यांनी स्वतच्या हातातील सोन्याच्या बांगडय़ा बाबूजींना त्याच ठिकाणी काढून दिल्या. यांसारख्या अनेक आठवणी आजही सर्वाच्या स्मरणात आहेत.
मंडळाने २००० सालापासून सावरकरांवर विशेष अभ्यास करणाऱ्या व त्याप्रमाणे आचरण करणाऱ्या व्यक्तीचा वीर सावरकर पुरस्कार देऊन सत्कार करण्यास प्रारंभ केला. २६ फेब्रुवारी हा सावरकरांचा आत्मार्पण दिन व २८ मे स्वा. सावरकरांची जयंती या दोन्ही दिवशी मंडळातर्फे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. फेब्रुवारी महिन्यात सावरकर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. प्राध्यापक अवधूत शास्त्री, कर्नल श्याम चव्हाण, विक्रम नारायण सावरकर, अरविंद कुलकर्णी, वा.ना.उत्पात, अरविंद गोडबोले, मिलिंद एकबोटे, दिलीप करंबेळकर, शेषराव मोरे आदी मान्यवरांना आतापर्यंत या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सध्याच्या तरुण पिढीला सावरकर, विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता आहे. त्यांचे विचार केवळ वाचून नाही तर ते आचरणात आणले गेले पाहिजेत. यासाठी सावरकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार याबरोबरच त्यांच्या साहित्याचा अभ्यास हे मंडळाचे उद्दिष्ट आहे. सावरकर मंडळाच्या वतीने नैमित्तिक कार्यक्रम सध्या होत नाहीत, परंतु ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते व्हावेत अशी इच्छा असून यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. सावरकरांचे विचार व साहित्य हे वेगळे असून त्यांचे साहित्य जास्त वाचले जात नाही. मुंबईतील सावरकर मंडळास अनेक विद्यार्थी भेट देतात, त्याच धर्तीवर येथेही असे मंडळ स्थापन होणे आवश्यक आहे. कारण ठाणे जिल्’ाातील किंवा ग्रामीण भागातील तरुणांना सावरकरांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई गाठावे लागते. त्यांना डोंबिवलीसारख्या साहित्यनगरीत हा अभ्यास उपलब्ध व्हावा म्हणून मंडळ प्रयत्नशील आहे.
शर्मिला वाळुंज सावरकर अभ्यास मंडळ, डोंबिवली