२२ मार्च, हा दिवस जागतिक पाणी दिन म्हणून साजरा केला जात असून यंदा शासनाच्यावतीने जलसाक्षरता अभियान राबवण्यात येत आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने संपूर्ण जगाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुष्काळाचे चित्र असून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तर ठाणे जिल्ह्य़ातही पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पाश्र्वभूमीवर यंदाची होळी केवळ प्रातिनिधिक पद्धतीने साजरा करण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजातील वेगवेगळ्या गटांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले असून अशा उपक्रमांची ओळख..
जिल्ह्य़ातील पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन ठाण्यातील सुमारे शंभराहून अधिक सोसायटय़ांनी आणि गृहसंकुलांनी होळी साजरी करणार नसल्याचे जाहीर केले आहे, तर अनेक गृहसंकुलांनी केवळ टिळा लावून ‘प्रतिनिधिक’ स्वरूपात होळी साजरी करणार असल्याचे स्पष्ट केले आहेत. ठाण्यातील रौनक पार्क, हिरानंदानी मेडोद, कलिना सोसायटी, प्रेस्टीज गार्डन, लोढा लक्झेरिया, शाल्मली, सिद्धचल, वसंत विहार, विकास कॉम्प्लेक्स यांसारख्या सोसायटय़ांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आहे. हळद, चंदनासारख्या नैसर्गिक रंगाची होळी साजरी करून पाण्याची बचत करण्याचा संदेश संपूर्ण इमारतींमध्ये देण्यात येणार आहे. होळीच्या दिवशी इमारतींचे नळ बंद ठेवण्याचा निर्णय या गृहसंकुलांनी केला असून होळीसाठी पाण्याचा वापर केला जाणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रभर दुष्काळी परिस्थिती असून जिल्ह्य़ातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. आठवडय़ातून ६० तासांपेक्षाही जास्त पाणीकपातीचे वेळापत्रक पाटबंधारे विभागाकडून आखले जात आहे. टंचाईच्या या पाश्र्वभूमीवर होळीच्या निमित्ताने होणाऱ्या पाण्याच्या मुक्तहस्ते उधळ रोखण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. शासकीय यंत्रणाच नव्हे तर रहिवासी संस्था, गृहसंकुलातील सदस्य, उद्योजक, दुकानदार आणि महाविद्यालयीन तरुणांनीही होळी केवळ प्रातिनिधिक स्वरूपात साजरी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. महाविद्यालयीन तरुण, सामाजिक संस्थांनी जनजागृतीच्या माध्यमातून पाण्याची नासाडी करणारी होळी साजरी करू नका, असे संदेश देण्यास सुरुवात केले आहेत. याच पाश्र्वभूमीवर गृहसंकुल, रहिवासी संस्था यंदा होळी साजरी करणार नाहीत, त्यामुळे यंदा ठाणेकरांसाठी यंदाची ‘होळी प्रातिनिधिक’ पद्धतीने साजरी केली जाणार आहे. रंगाची उधळण पूर्णपणे टाळून केवळ टिळा लावूनच होळीचा आनंद लुटला जाणार असल्याचे या मोहिमेमध्ये सहभागी गृहसंकुलांकडून सांगण्यात येत आहे.
होळीच्या निमित्ताने होणारा पाण्याचा अपव्यय टाळा, सुकी होळी साजरी करा, रेन डान्स बंद करा, साधी होळी साजरी करा, असे अनेक जनजागृतीपर घोषणा गेली महिनाभरापासून ठाणे शहरामध्ये दिल्या जात होत्या. जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जलसंपदा विभागाने जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यात जाऊन पाण्याचे महत्त्व विषद करण्याचा प्रयत्न केला. तर महाविद्यालयीन तरुणांनी पाण्याच्या जनजागृतीमुळे पाण्याचा अपव्यय टाळा असा संदेश देण्यापुरते न उरता त्याची प्रत्यक्ष कृतीमध्ये अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला आहे. होळीच्या दिवशी इमारतींमधील नळ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही माध्यमातून पाण्याचा अपव्यय करण्यात येणार नाही. शिवाय नैसर्गिक रंगाचा वापर करून शरीराला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाईल. हळद, चंदनापासून बनवलेले रंगाचा वापर टिळा लावण्यासाटी केला जाणार आहे, अशी माहिती या मोहिमेसाठी काम करणाऱ्या समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेकडून देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2016 रोजी प्रकाशित
गृहसंकुलांमध्ये ‘प्रातिनिधिक होळी’
नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने संपूर्ण जगाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
Written by श्रीकांत सावंत

First published on: 22-03-2016 at 02:34 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Save water on this holi festival