कल्याण-डोंबिवली महापालिका आणि नाटय़निर्माते आमनेसामने

डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृहातील तारखांवरून पुन्हा एकदा प्रशासन आणि निर्माता संघात वादाचे प्रयोग रंगू लागले आहेत. या नाटय़गृहात महिन्यातून एक किंवा दोन तारखा मिळत असल्याची नाटय़निर्मात्यांची तक्रार असताना प्रशासनाने मात्र किमान तीन ते चार तारखा नाटय़प्रयोगांसाठी दिल्या जात असल्याचे म्हटले आहे. त्यावर ‘नाटकांसाठी महिन्यातून चार तारखाच मिळत असतील तर, सावित्रीबाई फुले नाटय़गृह आहे की बँक्वेट सभागृह आहे,’ असा खोचक सवाल नाटय़निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केला आहे. गेल्या महिन्यात ‘कोडमंत्र’ या नाटकाच्या प्रयोगाला तारखा न देण्यात आल्याने यापुढे सावित्रीबाई फुले नाटय़गृहात नाटकाचे प्रयोग न करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

डिसेंबर महिन्यात नाटकांसाठी जेमतेम एखाददुसरी तारीख दिली गेल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले नाटय़मंदिराच्या डागडुजीसाठी हे नाटय़गृह बंद करण्यात येणार होते. त्यामुळे निर्माते संघ महापौरांना भेटण्यासाठी गेले नाहीत. मात्र कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात येणारे कल्याण येथील आचार्य अत्रे नाटय़गृह डागडुजीसाठी बंद केल्याने सावित्रीबाई फुले चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी निर्मात्यांना पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, अशा तक्रारी आता पुढे येत आहेत. या नाटय़गृहातील बंद वातानुकूलित यंत्रणा तसेच डागडुजीचे काम सुरू करण्यापूर्वीच नाटय़गृहातील प्रयोगांसाठी भाडेदर वाढ करण्यात आल्याचा आरोप प्रसाद कांबळी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. निर्माते धनंजय चाळके यांनी ज्या तारखा दिल्यात, त्या तारखा वाटप केल्याचा कोणतेही पत्र व्यवस्थापकातर्फे निर्मात्यांना देण्यात आलेले नाही असे सांगितले.

दरम्यान, महापौर राजन देवळेकर आणि नाटय़गृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांनी १६-१७ डिसेंबर, २४ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या तारखा नाटकांच्या प्रयोगाला दिल्या असल्याचे सांगितले. तसेच दहा वर्षांतून एकदा दरवाढ केली तर त्याला दरवाढ केली  म्हणायचे का, असा सवालही महापौरांनी केला.

नाटय़गृहाची डागडुजी असो किंवा दरवाढ निर्माता संघाला महापालिकेने विश्वासात घेणे गरजेचे आहे. नगर विकास योजनेत नाटय़गृह हे मनोरंजनाचे साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी नाटय़गृहाकडे स्थानिक प्रशासनाने महसुलाचे एक साधन म्हणून पाहू नये यासाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचीदेखील भेट घेऊन पत्र देणार आहोत.   – प्रसाद कांबळी, निर्माता संघ अध्यक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोडमंत्र या नाटकाच्या प्रयोगासाठी तीन महिन्यातून एकदा तरी तारीख मिळावी अशी अपेक्षा असते. परंतु व्यवस्थापक लधवा यांनी तारखा दुसऱ्या कार्यक्रमांसाठी दिल्या असल्याचे सांगितले. कोणत्या नाटकाला तारखा दिल्या आहेत ते सांगा, असे विचारल्यानंतर त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही या नाटकाचा प्रयोग यापुढे येथे करणार नाही.    – दिनू पेडणेकर, निर्माते 

नाटकांसाठी तारखा दिल्या जातात. मात्र डिसेंबर महिन्यात देव गंधर्वसारखे काही दर्जेदार कार्यक्रम होणार असल्याने या तारखा नाटकांसाठी देण्यात आलेल्या नाहीत.    – राजेंद्र देवळेकर, कल्याण-डोंबिवली महापौर