scorecardresearch

पुन्हा मृताच्या नावे लाटला मोबदला, कुशिवली धरणाच्या भुसंपादनात पुन्हा एकदा घोटाळा

मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची आणि मुळ मालकांची फसवणूक करत तब्बल १६ लाख ५९ हजारांची नुकसान भरपाईची रक्कम लाटल्याचे समोर आले आहे.

सागर नरेकर

अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथे सुरू असलेल्या लघु पाटबंधारे विभागाच्या धरणप्रकल्पासाठी भुसंपादन प्रक्रिया सुरू असून या भुसंपादन प्रक्रियेत मृत व्यक्तींच्या नावानेही मोबदला लाटण्याचे प्रकार समोर आले आहेत. महिनाभरात दुसऱ्यांना मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची आणि मुळ मालकांची फसवणूक करत तब्बल १६ लाख ५९ हजारांची नुकसान भरपाईची रक्कम लाटल्याचे समोर आले आहे. यावेळी दोन हयात असलेल्या व्यक्तींच्याही नावे मोबदला लाटलण्यात आला आहे. याप्रकरणी महिनाभरात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी ४७ लाखांचा मोबदला लाटण्यात आला होता.

ग्रामीण भागाची पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथे लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून धरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयामार्फत भुसंपादन प्रक्रिया राबवली जात होती. मात्र गेल्या काही महिन्यात या भूसंपादन मोबदला वाटपात बनावट कागदपत्रे सादर करत मोबदला लाटल्याचे प्रकार समोर आल्यानंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी बनावट कागदपत्रे सादर करून मोबदला लाटण्यासाठी काही व्यक्तींनी मृताच्या नावाचा वापर केला होता. उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघडकीस आला. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची चौकशी केली असता १४ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यामुळे त्यापूर्वी भूसंपादन प्रक्रियेत वाटलेल्या मोबदल्याच्या प्रकरणांचीही चौकशी करण्याची मागणी होऊ लागली. त्यात ११ मे रोजी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करत ४७ लाख रूपयांचा मोबदला लाटल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराला दहा दिवस उलटत नाहीत तोच अशाच प्रकारचा आणखी एक गुन्हा समोर आला आहे.

कुशिवली धरणासाठी आवश्यक जागेतील कुशिवली सर्वे क्रमांक ४८ / ३, ४९/५, ४९/६ मधील जागेचे मुळ वारसदार मंगळया जानू चिडा, सिता धोंडू पारधी, पांगो जानु चिडा यांचेपैकी मंगला जानू चिडा हे मृत आहेत. त्यानंतरही त्यांचा भुसंपादनाचा मोबादला मिळविण्यासाठी काही अज्ञात व्यक्ती यांनी ते स्वत: मंगळया जानू चिडा असल्याचे भासवत बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच हयात असलेल्या सिता धोंडू पारधी आणि पांगो जानु चिडा यांच्याही नावे मोबादला मिळण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे अर्ज करण्यात आला. त्या माध्यमातून १६ लाख ५९ हजार ८३६ रूपये मिळवून अपहार केला. हा प्रकार समोर येताच स्थानिक तलाठी प्रविण रावसाहेब नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकारामुळे उपविभागीय कार्यालयात झालेल्या भुसंपादन प्रक्रियेतील पूर्वी झालेल्या प्रकरणांवरही संशय व्यक्त होऊ लागला आहे. या प्रकरणात आता हयात असलेल्या व्यक्तींचाही मोबदला लाटल्याने या प्रक्रियेला संशयाने पाहिले जाऊ लागले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Scam in land acquisitions of kushavali dam in ambernath taluka asj