दिव्यामध्ये सेना-भाजपमध्ये शीतयुद्ध; गैरव्यवहार झाल्याचा भाजपचा आरोप

ठाणे महापालिकेचाच एक भाग असलेल्या दिवा शहरात ११ नगरसेवक असूनही येथील समस्या काही कमी होताना दिसत नाहीत. कचराभूमीनंतर आता दिव्यातील नालेसफाईचा प्रश्न सध्या शहरात गाजत असून यात सत्ताधारी सेना-भाजपमध्येच शीतयुद्ध रंगले आहे. दिव्यातील नालेसफाईत गैरव्यवहार झाल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने करत बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले तर दुसरीकडे सेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी नालेसफाई कामाचा पाहणी दौरा केला.

ठाणे महापालिकेचाच एक भाग असलेल्या दिवा शहराकडे पालिका प्रशासनाने आत्तापर्यंत दुर्लक्षच केले आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत शहरातून ११ नगरसेवक निवडून आल्याने या भागाला अचानक महत्त्व दिले गेले. सेनेचे ८ नगरसेवक दिव्यातून निवडून आले असून उपमहापौर पदही दिव्याला मिळाले आहे. दिव्याच्या विकासासाठी विविध विकासकामांचे प्रस्ताव मांडले असून ते लवकरच प्रत्यक्षात येतील असे सत्ताधारी सेना नागरिकांना ठासून सांगत आहे. मात्र सध्या ज्या पायाभूत असुविधांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे, त्यातून तरी नागरिकांची प्रथम सुटका करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. निवडणूक काळात मनसेने दिव्यातील कचराभूमीचा प्रश्न उचलला. त्यानंतर भाजपनेही तोच मुद्दा लावून धरला. मात्र कचराभूमीचा प्रश्न काही सुटला नाही.

दिव्यातील नालेसफाई झाली असल्याचा दावा सत्ताधारी सेनेने केल्यानंतर भाजपने त्यावर आसूड ओढत नालेसफाईत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. कंत्राटदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संगनमताने कामे न करताच निधी लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत भाजपने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या वेळी दिवा विभागातील नालेसफाईसाठी एकूण ५५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. यामध्ये १५ लाख अंतर्गत गटारे, १५ लाख रेल्वे कल्व्हर्टसाठी तर २५ लाख नालेसफाईसाठी मंजूर झाले असल्याचे भाजपचे कल्याण -डोंबिवली जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी सांगितले. नालेसफाईचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अंतर्गत गटारे, नाले साफ न केल्याने पहिल्याच पावसात अनेक चाळींत, रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून आल्याचे रोहिदास मुंडे यांनी सांगितले. तसेच रेल्वे अंतर्गत येणाऱ्या दिवा-दातिवली येथील रेल्वे नाल्याची सफाई झाली नसल्याचे आदेश भगत यांनी सांगितले. या सर्व मुद्दय़ांना हाताशी धरत भाजपच्या दिवा शीळ मंडळाने उपोषण केले.

मनसेची गुपचिळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी तात्काळ नालेसफाई कामाचा पाहणी दौरा बुधवारी झाला. या वेळी अधिकाऱ्यांना दम देत येत्या तीन दिवसांत नालेसफाईची कामे पूर्ण झाली पाहिजेत असा इशारा त्यांनी दिला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसांत काम करू असे सांगताच भाजपने दुपारी उपोषण मागे घेतले. बुधवारी सकाळी या सर्व घडामोडींमुळे दिव्यात नालेसफाईच्या कामावरून सेना भाजपतच युद्ध रंगल्याचे दिसून आले. तर दिव्यातील कचराभूमीच्या प्रश्नावर सर्वप्रथम आवाज उठविणारी मनसे यावर गप्प दिसून आली.