डोंबिवली : ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ सारस्वत काॅलनी नेहरू रस्त्यावर एका नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीसमोवर विकासकाने गटार बांधले नसल्याने परिसरातील सांडपाणी मागील वर्षभर रस्त्यावरून वाहते. या वाहत्या सांडपाण्याचा पादचारी, वाहन चालकांना त्रास होतो. याविषयी स्थानिक माजी नगरसेविकाने फ प्रभाग साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे तक्रार केली होती. साहाय्यक आयुक्तांनी तातडीने विकासकाला घटनास्थळी बोलावून पाऊस सुरू होण्यापूर्वी मे अखेरपर्यंत मुख्य वर्दळीच्या विकास आराखड्यातील रस्त्यावरील गटार बांधून पूर्ण करण्याची सूचना केली आहे.

ठाकुर्ली पूर्व वाहनतळाच्या बाजुला रखडलेल्या ठाकुर्ली पूल ते म्हसोबा चौक दरम्यानच्या पुलाच्या बाजुला एका विकासकाने एक नवीन अधिकृत इमारत बांधली आहे. या इमारतीच्या मुख्य रस्त्याकडील बाजुला गटाराची बांधणी करून देणे हे विकासकाचे काम होते. ठाकुर्ली पुलाखाली मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर गटार नसल्याने ठाकुर्ली चोळे भागातून येणारे पावसाचे, सांडपाणी नेहरू रस्त्यावरून सारस्वत काॅलनी भागातून मग नाल्यात जात होते.

गटार नसल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासाविषयी स्थानिक नगरसेविका खुशबू चौधरी यांनी फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. आयुक्त अभिनव गोयल यांनी पावसाळ्यापूर्वीची नाले, गटार सफाईची प्रभागस्तरावरील कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. माजी नगरसेविका चौधरी यांची तक्रार प्राप्त होताच फ प्रभाग साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याची पाहणी केली. तेथे गटार नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे निदर्शनास आले.

साहाय्यक आयुक्तांनी नवीन इमारत उभारणारा विकासक यांना घटनास्थळी बोलावून घेतले. प्राप्त तक्रारीप्रमाणे विकासकाला पाऊस सुरू होण्यापूर्वी पुलाखालील रस्त्यावर गटार बांधण्याची सूचना केली. तसेच बुजविलेला गटाराचा भाग सुस्थितीत करण्याची सूचना केली. विकासकाने साहाय्यक आयुक्तांना काही अडचणीचे विषय सांगितले. हा विषय मुंबरकर यांनी उपायुक्त रमेश मिसाळ यांना सांगितला. गटार हा अत्यावश्यक सेवेचा भाग असल्याने वरिष्ठांच्या मंजुरीने साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी विकासकाला तातडीने आपल्या इमारती समोरील भागात गटार काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. या कामात कोणी अडथळा आणला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी केली आहे.
या भागात गटाराचे काम झाले तर रस्त्यावरील सांडपाण्याचा नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे. फ प्रभाग हद्दीतील सखल भाग, नाले, गटार सफाईच्या कामांची दैनंदिन पाहणी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सुरू केली आहे.

ठाकुर्लीत पूर्व रेल्वे स्थानकाजवळील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर विकास आराखड्यातील रस्त्यावर गटार नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत होते. या भागातील गटार बुजविल्याच्या तक्रारी माजी नगरसेविकेने केल्या होत्या. या प्रकरणाची माहिती घेऊन संबंधित विकासकाला वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी गटार बांधण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रभागातील गटार, नाले सफाईची कामे सुस्थितीत सुरू आहेत याची दैनंदिन पाहणी केली जात आहे. हेमा मुंबरकर साहाय्यक आयुक्त,फ प्रभाग.