ठाणे : इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरोधात देशव्यापी संघर्ष पुकारणारे आणि सह्याद्रीचा सिंह अशी ओळख असलेले आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची शहापूर तालुक्यातील त्यांच्या उभ्रई गावातील समाधी स्थळाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समाधीची किमान डागडुजी तरी शासनाने करावी अशी मागणी येथील स्थानिक आदिवासी समाजाकडून केली जात आहे. मात्र याकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने आता शहापूर मधील नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या समाधी स्थळाची वाईट अवस्था झाल्याने सर्वच स्तरांतून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
शहापूर तालुका हा ठाणे जिल्ह्यातील १००% पेसा अधिनियमांतर्गत येणारा अनुसूचित क्षेत्र आहे. त्यामुळे येथे आमदार, सभापती, सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती अशी सर्व राजकीय पदे १००% आदिवासी समाजासाठी आरक्षित आहेत. हा तालुका डोंगर-दऱ्या, नद्या, धरणे, समृद्ध जैवविविधता आणि आदिवासी सांस्कृतिक परंपरेने नटलेला आहे. सध्या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे दर्शन घडते. या तालुक्यातील ही जैविविधता पाहण्यासाठी आणि याचा अनुभव घेण्यासाठी प्रामुख्याने पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इतर जिल्ह्यांतून पर्यटक शहापूरमध्ये आवर्जून येतात. तर अनेकांचे या तालुक्यात शेतघरे देखील आहेत.
मात्र याच आदिवासी बहुल जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांच्या हक्कांसाठी इंग्रजांविरोधात लढा देणारे क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधीस्थळाकडे मात्र सरकार आणि स्थानिक प्रशासनकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याने समाधीस्थळाची पुरती दुरवस्था झाली असून फक्त काही खडक या ठिकाणी समाधी स्थळाच्या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत. यामुळे आदिवासी समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातुन नुकतेच याबाबत आंदोलन देखील करण्यात आले. तर समाधीकडे प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील संघटेनच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
मागण्या काय ?
शहापूर तालुक्यात आदिवासी क्रांतिवीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा आणि नाग्या कातकरी यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनाने योग्य जागा उपलब्ध करून द्यावी. तर उभ्रई गावातील राघोजी भांगरे समाधीला श्रद्धास्थळ घोषित करून आवश्यक पायाभूत सुविधा व विकासकामे करण्यात यावीत. चौकट इतिहास काय ? राघोजी भांगरे आदिवासी क्रांतिकारक होते. ब्रिटिश आणि सावकारांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी नगर, नाशिक, ठाणे परिसरात बंड पुकारले. गरीबांना मदत, सावकारांची कागदपत्रे नष्ट करणे, आणि ब्रिटिशांच्या तुकड्यांना सळो की पळो करून सोडणे हे त्यांच्या लढ्याचे
वैशिष्ट्य
शहापूर तालुक्यातील उंभ्रई गावातील भांगरा डोंगरावर त्यांनी लढ्याचे ठिकाण उभारले. येथूनच गुप्त पद्धतीने ते आपल्या लढ्याच्या रणनीती आखात. मात्र फंदफितुरीमुळे पंढरपूर येथे गोसाव्याच्या वेशात असताना ते पकडले गेले असल्याच्या कथा गावकऱ्यांकडून सांगितल्या जातात. यानंतर ब्रिटिश न्यायालयाने वकील न देता खटला चालवला आणि २ मे १८४८ रोजी राघोजी यांना ठाणे कारागृहात फाशी दिली. त्यानंतर उंभ्रई गावातील भांगरा डोंगराच्या पायथ्याशी त्यांचे समाधीस्थळ उभारण्यात आले. मात्र आज त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
प्रतिक्रिया
राघोजी भांगरे हे आदिवासी समाजातील महान क्रांतिकारक आहेत. मात्र त्यांच्या समाधी स्थळाची दुरवस्था योग्य नाही. यासाठी शासनाकडे गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत आहे. मात्र आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. प्रकाश खोडका, श्रमजीवी संघटना