Social Media Trend : ठाणे – महाराष्ट्रात अंतरा अंतरावर माणसाचे राहणीमान, व्यवसाय, चालीरीती, बोली भाषा याच फरक जाणवतो. मग ती कोल्हापूरची रांगडी भाषा असो किंवा खानदेशातील खानदेशी, कोकणातील मालवणी भाषा असो किंवा पुणेकरांची पुणेरी शैली असो. प्रत्येकाची एक वेगवेगळी शैली आहे. अशातच, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूरच्या नागरिकांची एक स्थानिक बोलीभाषा आहे. जी थोडीशी गावरान, विनोदी आणि अगदी आपुलकीची वाटणारी. हीच बोलीभाषा मुरबाड, शहापूरची ओळख असल्याचे म्हटले जाते. हीच मुरबाडी भाषा सोशल मीडियावर तुफान व्हारयल होत असल्याचे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे.
जगातील अनेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषा देखिल एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची पोटभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत आणि वाक्यप्रचारांत बदलत असते. पिढ्या न् पिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा प्रभाव असल्याचे दिसून येते. मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एक असले तरी स्थानानुसार मराठी बोलीचे कोंकणी मराठी, कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, असे अनेकविध प्रकार बोलले जातात. भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, संगमेश्र्वरी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, तंजावर, नंदुरबारी असे बोलींचेविविध प्रकार आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातही भाषांचे विविध प्रकार आढळून येतात. यामध्ये मुरबाड तालुक्याची मुरबाडी भाषा देखील प्रसिद्ध आहे. अनेक लेखक, कवी या भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करित असतात. अशातच सोशल मिडीयाचा ट्रेंड लक्षात घेऊन या माध्यमाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.
नेमके मुरबाडी बाईमाणूस म्हणजे काय ?
मुरबाडी भाषा ही थोडीशी गावरान, विनोदी आणि आपुलकीची अशी आहे. या भाषेतील विविध शब्द हे मुरबाडची ओळख सांगतात. अशातच इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मिडीयावर मुरबाडी बाईमाणूस म्हणजेच प्राची पाटिल यांनी या भाषेतून दररोजच्या घटना सांगण्यास सुरूवात केली. जे जीवन येथील नागरिक दररोज जगतात, बोलतात या सांगण्यास सुरूवात झाली आणि अगदी कमी कालावधीत या भाषेच्या रिल्स सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाल्या.
प्राची पाटिल कोण आहेत ?
मुरबाडी बाईमाणूस या पात्रात असणारी प्राची पाटिल ही मुळची मुरबाड येथील अल्याणी गावची आहे. तिचे आजोळ मुरबाडमधील किसळ गावचे आहे. ती एक शिक्षिका, गायिका, आणि निवेदिका आहे. मामाच्या गावी बालपण गेल्याने आजोबांच्या सानिध्यात ती मुरबाडी भाषा शिकली. आणि आता मुरबाडची बाईमाणूस म्हणुन ती सोशल मिडीयावर (Instagram) मुरबाडी भाषेचा प्रचार आणि प्रसार करित आहे.