ठाणे : भिवंडी येथे काही दिवसांपूर्वी ३० लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त करत तीन आरोपींना अटक केले होते. या आरोपींविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपींकडून माहिती घेऊन या गुन्ह्यातील आणखी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १५ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
रामदास शालिक दळवी, विजय सुदाम कर्णेकर उर्फ विकी आणि शेखर रामदास बत्तीन असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तपासा दरम्यान रामदास दळवी याच्याकडून तपास पथकाने पंचनाम्याद्वारे बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेला लॅपटॉप, प्रिंटर, कटर, बॉन्ड पेपर आणि १५ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईत भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत एकूण ४५ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि छपाईसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असून अधिक यात आणखी काही आरोपींचा समावेश आहे का, याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
घटना काय ?
भिवंडी येथील अवचितपाडा परिसरात काहीजण भारतीय बनावटीचे चलन घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने काही दिवसांपूर्वी अवचितपाडा येथे सापळा रचला. अवचितपाडा येथे रिक्षामधून तीन जण बनावट नोटा घेऊन आले. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे सुरज शेंडे, भारत सासे आणि स्पप्नील पाटील असल्याचे सांगितले.
त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडील बॅगेत ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी या नोटा बनावट असल्याची कबूली दिली. दरम्यान, पोलिसांनी पडताळणी केली असता नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या आरोपींची पोलिसांनी अधिक तपासणी केली असता,रामदास शालिक दळवी, विजय सुदाम कर्णेकर उर्फ विकी आणि शेखर रामदास बत्तीन या आरोपींची नावे समोर आली आणि पोलिसांनी या तिघांनाही अटक केले.