ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले की राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा फायदा करून घेतला, असा प्रश्न राज्याचे शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला.
राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले असून ते उच्च न्यायालयानेही आता मान्य केल्याचा आरोपही शेलार यांनी केला. मनसेने राष्ट्रवादी किंवा अन्य कोणत्याही पक्षाची मदत घेतली तरी ते शून्यच राहणार असल्याचा टोलाही शेलार यांनी लगावला.
शेलार यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाने केलेल्या आरोपानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने सूतगिरण्या आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पैसे बुडविले, असा आरोप करून शरद पवार यांनी याबाबत आधी उत्तर द्यावे, असे आव्हान शेलार यांनी दिले.
गेल्या पाच वर्षांत भाजप-शिवसेना सरकारने ४३ लाख ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा केले असून पवार यांनी सत्तेवर असताना किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले याचे आकडे जाहीर करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. कलम ३७० रद्द करण्याला विरोध आहे का, हे पवारांनी जाहीर करावे आणि याबाबत पवारांना जे वाटते, तेच इम्रान खान यांना का वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला.
५०० चौरस फुटाच्या घरांचा कर माफ करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई महापालिकेप्रमाणेच अशा प्रकारचे उत्पन्न सोडले तरी चालेल, त्या ठिकाणी ही योजना राबविता येईल. मात्र राज्यातील सर्वच महापालिकांची अशी स्थिती नाही. तसेच कर माफ करण्याचा कायदा झाला असला तरी दुसऱ्या भागांसाठी वेगळे विधेयक आणावे लागेल, असे शेलार म्हणाले.
सेनेचा वचननामा हे युतीचे वचन!
शिवसेनेने वचननामा प्रसिद्ध केला असला तरी युतीचे वचन म्हणून आमचे सरकार ते पूर्ण करेल. मग ते दहा रुपयांत जेवण देण्याचे वचन असेल किंवा अन्य वचन असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर काही निर्णय झाले असून युतीचा वचननामा लवकरच येईल, असे शेलार यांनी स्पष्ट केले.