शेअर रिक्षाचे भाडेदर बदलणार

करोना र्निबधांच्या काळात ठाणे, कल्याण डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये रिक्षाचालकांनी अवाजवी पद्धतीने शेअर रिक्षांच्या दरामध्ये वाढ करत प्रवाशांची लूट केली.

परिवहन विभागाकडून नव्याने आखणी; प्रवाशांना हरकती नोंदवण्याचे आवाहन

ठाणे/कल्याण : करोना र्निबधांच्या काळात ठाणे, कल्याण डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये रिक्षाचालकांनी अवाजवी पद्धतीने शेअर रिक्षांच्या दरामध्ये वाढ करत प्रवाशांची लूट केली. करोनाचा दाह कमी झाला तरीही वाढीव पद्धतीने होत असलेली भाडे आकारणी सुरूच असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे ठाणे आणि कल्याण परिवहन विभागाने शेअर रिक्षांच्या भाडेदराची नव्याने आखणी सुरू केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने निर्बंध लागू केले होते. त्यानुसार शेअर रिक्षामध्ये केवळ दोन प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती. शेअर रिक्षा प्रवासाचे दर हे प्रादेशिक परिवहन विभागाकडून ठरविले जातात. असे असताना करोनाच्या कालावधीत जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच बदलापूर भागांमध्ये शेअर रिक्षाचालकांनी अवाजवी पद्धतीने भाडेवाढ केली होती. र्निबधांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतरही काही रिक्षाचालकांनी रिक्षामध्ये तीन ते चार प्रवासी घेऊनही भाडेदर कमी करण्यास तयार नव्हते. यामुळे प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. दरम्यान, प्रादेशिक परिवहन विभागाने ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर भागांत शेअर रिक्षा प्रवासाचे दर निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागांतर्गत असलेल्या डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये प्रस्तावित दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यासंदर्भाच्या हरकती किंवा सूचना प्रशासनाने मागविल्या आहेत. ठाणे शहरातील शेअर रिक्षा प्रवासाचे दर निश्चित करण्याचे काम परिवहन विभागाने सुरू केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रस्तावित दर असे

  • डोंबिवली रेल्वे स्थानक ते कोपरगाव नऊ रुपये, फुले चौक ते सत्यवान चौक १२ रुपये, सत्यवान चौक ते विष्णुनगर जुने पोलीस ठाणे १४ रुपये.
  • डोंबिवली पूर्व तांदूळ बाजार ते टाटा पॉवर १२ ते २७ रुपये, केळकर रस्ता ते पी अ‍ॅण्ड टी कॉलनी १२ ते १३ रुपये, स्थानक ते लोढा हेवन, काटई नाका १८ ते ४० रुपये, बाजीप्रभू चौक ते शेलार चौक, एम्स रुग्णालय, डीएनएस बँक, मॉडेल कॉलेज, अन्नपूर्णा हॉटेलपर्यंत १३ ते ३० रुपये भाडे.
  • कल्याण पूर्व स्थानक ते काटेमानिवली, तिसगाव, तिसाई, विजयनगर, राहुलनगर, काटेमानिवली लोकग्राम, साईबाबा मंदिर, विठ्ठलवाडी, नांदिवली तलावपर्यंत १२ ते १६ रुपये.

कल्याण पश्चिम स्थानक ते लाल चौकी, शहाड, चिकनघर, आरटीओ कार्यालय, उल्हासनगर ११ ते २६ रुपये.

  • बदलापूर पश्चिम स्थानक ते दत्त चौक, भारत कॉलेज पर्यँत १३ ते २८ रुपये.

उल्हासनगर स्थानक ते लालचक्की, रामेश्वर संकुल, अंबरनाथ स्थानक ते नवरेनगर, ग्रीन सिटी  १२ ते १८ रुपये.

परिवहन प्राधिकरणाने सुचविलेल्या दरवाढीप्रमाणे कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात मीटर, शेअरप्रमाणे कि.मी. अंतराने भाडे प्रस्तावित केले आहे. प्रवाशांनी येत्या शुक्रवापर्यंत वाढीसंदर्भात हरकती नोंदवायच्या आहेत.

तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Share rickshaw fare change ysh

ताज्या बातम्या