नागरी कामे मार्गी लावण्याच्या अनुषंगाने ठाणे महापालिकेचा निर्णय

सध्या ठाणे महापालिका आणि पोलीस या दोन्ही विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चांगले समन्वय असल्याचे चित्र सातत्याने पुढे येत असून यातूनच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली अनेक नागरी कामे मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यातूनच शीळ येथील जकात नाक्याची जागा शीळ-डायघर पोलीस ठाण्यासाठी देण्याच्या हालचाली महापालिका प्रशानाने सुरू केल्या असून त्यासंबंधीचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी नुकताच महापालिकेला दिला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत शीळ-डायघर पोलीस ठाणे येते. दीड लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण तसेच शहरी असे दोन्ही परिसर येतात. शीळफाटा असे महत्त्वाचे जंक्शन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून तेथून उरण तसेच पनवेलमार्गे ठाणे व अन्य शहरांच्या दिशेने होणारी अवजड वाहनांची मोठी वाहतूक सुरू असते. हे पोलीस ठाणे शीळ-महापे रस्त्यालगतच असून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. प्रत्यक्षात मात्र हे काम सुरू झालेले नाही. या कामामध्ये रस्त्यालगतची बांधकामे हटविण्यात येणार असल्यामुळे पोलीस ठाणे दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महापालिकेकडे नुकताच एक प्रस्ताव पाठविला आहे. त्यामध्ये शीळ जकात नाक्याची जागा शीळ-डायघर पोलीस ठाण्याला देण्याची मागणी केली आहे. महापालिकेने जकात बंद केली, तेव्हापासून ही जागा वापराविना पडून आहे. त्यामुळे ही जागा पोलीस ठाण्यासाठी देण्याची मागणी पोलिसांनी केली आहे. ठाणे महापालिका प्रशासनानेही तात्काळ ही जागा देण्याची तयारी दर्शवत अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पोलीस आयुक्तांचे पालिकेला पत्र

शीळ येथील जकात नाक्याची जागा शीळ-डायघर पोलीस ठाण्यासाठी देण्यासंबंधीचे पत्र ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महापालिकेला दिले होते. त्यानुसार, ही जागा पोलिसांना देण्याची तयारी दाखवून त्यासाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या नव्या जागेमुळे पोलिसांना सुसज्ज पोलीस ठाणे मिळणार आहे. तसेच शहरातील मोक्याच्या ठिकाणी पोलीस ठाणे होणार असल्यामुळे त्या भागातील कायदा व सुव्यवस्था राखणे पोलिसांना सहज शक्य होईल. याशिवाय, जकात नाक्याची जागा मोठी असल्यामुळे तिथे पोलीस ठाणे उभारण्याबरोबरच अतिरिक्त पोलीस फौजफाटा ठेवणे शक्य होईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.

महत्त्वाचे मुद्दे

  • शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीचे क्षेत्रफळ ४०.५६ चौरस किलोमीटर इतके असून या भागातील लोकसंख्या दीड लाखांच्या आसपास आहे.
  • शीळ फाटा, दहीसर मोरी, खर्डी, फडकेपाडा, खिडकाळी, पडले, डवले, देसाई नाका, शंग्रीला रिव्हरवूड कॉम्पलेक्स, नरवळी, बालेगाव, एसआरपीएफ कॅम्प, वाकळण, बामरली हे विभाग या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात.