कल्याण – चंद्र दर्शनानुसार शनिवारी किंवा रविवारी बकरी ईद साजरी होणार आहे. यानिमित्ताने कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी मुस्लिम समाज नमाज अदा करण्यासाठी एकत्र येतो. याच दिवशी आणि वेळी दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसेनेचे घंटानाद आंदोलन लालचौकी भागात सुरू असते. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ला भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दुर्गाडी किल्ला भागातून होणारी वाहतूक इतर रस्ते मार्गाने वळविण्यात आली आहे.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी यासंदर्भातची एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी मुस्लिम समाज ईदच्या दिवशी नमाज अदा करण्यासाठी अधिक संख्येने जमतो. नमाज अदा सुरू असताना कल्याण परिसरातील शिवसैनिक दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी लालचौकी येथे घंटानाद आंदोलन करतात. या शिवसैनिकांना लालचौकी भागात मार्गरोधक लावून रोखून धरले जाते.या दोन्ही घटना एकाचवेळी आणि दुर्गाडी किल्ला भागात होत असल्याने या भागात वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून दुर्गाडी किल्ला, पूल रस्ते मार्गाने होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, असे उपायुक्त शिरसाट यांनी सांगितले.

प्रवेश मार्ग आणि प्रवेश बंद

कल्याण शहरातून भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लालचौकी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने लालचौकी येथे उजविकडे वळण घेऊन आधारवाडी, वाडेघर सर्कलमार्गे इच्छित स्थळी जातील. भिवंडीकडून, कल्याण शहरातील जुना आग्रा मार्गे, गोविंदवाडी वळण रस्ता मार्गे कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी किल्ल्याची पायथ्याशी दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने दुर्गामाता चौक येथे डाविकडे वळण घेऊन आधारवाडी, वाडेघर सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण पूर्व, डोंंबिवली, शिळफाटामार्गे गोविंदवाडी वळण रस्ता येथून दुर्गाडी किल्ल्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने शिवाजी चौक, लालचौकीमार्गे जातील. बकरी ईदच्या दिवशी गोविंदवाडी वळण रस्ता आणि शिवाजी चौक पत्रीपूलमार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना दिवसा, रात्री प्रवेश बंद असणार आहे. या वाहनांनी पर्यायी रस्ते मार्गाने जावे. शनिवारी दिवसभर आणि रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत ही अधिसूचना अंमलात असणार आहे, असे उपायुक्त शिरसाट यांनी सांगितले.