ठाणे : भाजप-सेनेचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास विभाग होता.  त्यांच्या कार्यकाळातच नगरविकास विभागाने विहंग गार्डन संकुलामध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच महापालिका स्तरावर यासंबंधी निर्णय घ्यावा असेही या विभागाने त्यावेळी निर्देश दिले होते. त्यामुळे फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयांचाही किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांनी अभ्यास करावा, असा टोला लगावत भाजप नेत्यांचे घोटाळे  मी येत्या काही दिवसात बाहेर काढेन, असा इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी सूडबुद्धीने छाब्बया विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम तांत्रिकदृष्टय़ा बेकायदा ठरविले होते. परंतु राज्य सरकारने दंड माफ करून आम्हाला न्याय दिला आहे, असा दावा यावेळी सरनाईक यांनी केला आहे. एक इंचही अनधिकृत बांधकाम केले असेल तर आमदार पदाचा राजीनामा देईन, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. किरीट सोमय्या यांना या प्रकल्पास किती दंड आकारण्यात आला होता हे देखील माहिती नाही. फडणवीस यांच्या कार्यकाळात यासंबंधी नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती आधी सोमय्या यांनी घ्यावी. ठाण्यातील भाजपच्या कोणत्या आमदाराने एसआरए योजनेमध्ये सदनिका घेतली, कोपरी तरण तलावाचे पाणी कोणी चोरले, कोणत्या नगरसेवक निधीतून हे काम झाले, भाजपच्या कोणत्या माजी गटनेत्याने स्थानक परिसरातील सायकल स्थानकांची जागा हडप केली, गटनेत्याने संस्थेच्या माध्यमातून कोणते गैरप्रकार केले हे सगळे मी बाहेर काढणार आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mla pratap sarnaik clarify on unauthorised construction in thane zws
First published on: 15-01-2022 at 03:18 IST