ठाणे : नवी मुंबई महापालिकेतील उबाठाच्या सात नगरसेवकांपाठोपाठ आणखी एका नगरसेविकेसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरूवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या दरम्यान, मुंबई महानगरात शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू असून यापुढेही ती अशीच सुरू राहील, असे सांगत नवी मुंबई पालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्याची सुचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. मुंबईत ५० नगरसेवक तर, ठाण्यात सर्वच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबई महानगरात शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू असून यापुढेही ती अशीच सुरू राहील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी ठाण्यातील पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलताना सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतही आपल्याला यश मिळवायचे आहे, अशा सुचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केल्या.
मुख्यमंत्री असताना राज्यात झालेले काम सर्वांनी पाहिले. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रकल्प बंद पाडले. ते स्थगिती सरकार होते. परंतु आपले प्रगती आणि समृद्धी सरकार आहे, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
गेल्या अडिच वर्षात अनेक विकास कामे झाली. लोकाभिमुख योजना सुरू झाल्या, असे सांगत लाडकी बहिण योजना कधीच बंद पडणार नसल्याचा पुनर्रच्चारही त्यांनी यावेळी केला. आम्ही जे बोलतो, ती प्रत्येक गोष्ट करतो. जाहीरनामा हे वचन समजतो. म्हणूनच पाच वर्षात हे वचन टप्प्याटप्प्याने पुर्ण करण्यासाठी पुढे जात आहोत. आमचे सरकार प्रिंटींग मिस्टेक म्हणारे नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. आमची टिम तीच आहे. आधी मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि मी उपमुख्यमंत्री आहे. आमचे सरकार सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून काम करीत आहे, असेही शिंदे म्हणाले.
शिवसेनेत अनेकजण दाखल होत असून त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. कारण, मी होणार असेल, तेच बोलतो. जे होणार नसेल ते नाही बोलतो. खोटे बोलत नाही. कारण, बाळासाहेब ठाकरे हे सांगायचे की, तुम्ही जो शब्द देत आहात, त्याचा दहा वेळा नव्हे तर शंभर वेळा विचार करा आणि शब्द दिला की तो पुर्ण करा, असे शिंदे म्हणाले.
नवी मुंबईत युतीचा भगवा फडकवानवी मुंबईतील उबाठाचे शंभर टक्के नगरसेवक खऱ्या शिवसेनेत दाखल झालेले आहेत, असे सांगत आता नवी मुंबई पालिकेत महायुतीचा भगवा फडकविण्याचे काम करा, अशा सुचना शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
नवी मुंबईत उबाठाला पुन्हा धक्का
नवी मुंबई महापालिकेतील उबाठाच्या सात तर, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहाअशा एकूण १३ नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला असतानाच, त्यापाठोपाठ उबाठाच्या नगरसेविका सुनीता मांडवे, त्यांचे पती रतन मांडवे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरूवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदाश्रमात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार नरेश म्हस्के हे उपस्थित होते.