अंबरनाथ : अंबरनाथ शहरात शिधावाटप दुकानांमधून ग्राहकांना शिधा देण्यास केली जाणारी टाळाटाळ, त्यांना माराव्या लागणाऱ्या फेऱ्या यासह शहरात गेल्या काही दिवसात वाढलेला शिधा काळाबाजार याविरूद्ध शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिधावाटप कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला. शिधावाटपाबाबत असलेल्या तक्रारी मिटवा. अन्यथा येत्या १५ दिवसात तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच यावेळी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी शहरातील नागरिकही उपस्थित होते.

अंबरनाथ शहरात शिधा चोरी वाढली आहे. तसेच आता शिधा माफियाही वाढले आहेत. १० टन धान्य आले की त्यातील २ टन धान्य वितरीत केले जाते. यात शिधावाटप कार्यालयातील निरिक्षकही गुंतलेले आहेत, असा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, राजेंद्र वाळेकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक निखील वाळेकर आणि पदाधिकारी तसेच नागरिकांनी शुक्रवारी अंबरनाथ पश्चिमेतील शिधावाटप कार्यालयात धडक दिली. यावेळी राजेंद्र वाळेकर यांनी अधिकाऱ्यांना विविध विषयांवरून खडे बोल सुनावले. शहरातला शासनाकडून येणारा शिधा बाजारात विकला जातो. दुकानदार, बिस्किट कंपन्यांना हे धान्य विकले जात आहे. रात्री अपरात्री लहान गाड्यांमधून त्याची विक्री केली जाते आहे. १५ दिवसात हे प्रकार न थांबल्यास भव्य मोर्चा काढून तुमच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा यावेळी वाळेकर बंधूंनी दिला.

शिधा धान्यात अधिकाऱ्यांचा नक्कीच सहभाग आहे. त्यामुळे आम्ही विनंती करायला आलेलो आहोत. एवढे दिवस कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. शिधावाटप केंद्रांवर आलेल्या धान्याची नोंद असायला हवी. अनेकदा दुकानांत इंटरनेट नाही, मिशन चालत नाही, केवायसी नाही अशी कारणे देत ग्राहकांना शिधा दिला जात नाही, असाही आरोप यावेळी करण्यात आला. आम्ही आता पोलिसांनाही निवेदन देणार आहोत, की याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी माहिती अरविंद वाळेकर यांनी बोलताना दिली. निरिक्षकांवर अधिकाऱ्यांचा वचक नाही. शिधावाटप दुकानदारांकडून हफ्ते घेतले जातात असा आमचा संशय आहे असेही वाळेकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्हीही तुमच्यासाठी प्रयत्न करू

गरिबांना धान्य मिळावे म्हणून राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. पण तुम्ही ते धान्य काळ्या बाजारात विकतात. हे प्रकार थांबायला हवेत. गरिबाला जे मिळते ते तो बिचारा घेतो. मात्र त्याची लूट होते आहे. तुमचे शिधावाटप कार्यालय गळके असून त्याची दुरावस्था झाली आहे. त्यासाठीही आम्ही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. तुम्हाला आम्ही चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तुम्हीही नागरिकांसाठी काम करा, असा दम यावेळी अरविंद वाळेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्याला भरला.