समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीचे निमित्त साधत रहिवाशांचा मेळावा
राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा होऊनही गेल्या काही वर्षांपासून प्रक्रियेच्या फेऱ्यात सापडलेल्या समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीचे निमित्त साधत शिवसेनेने ठाण्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पुन्हा जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले असून या योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी आग्रही असलेल्या आंदोलनकर्त्यांसह शेकडो रहिवाशांना एकत्र आणत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी या आपल्या मतदारसंघात घेतलेला नागरिकांचा मेळावा शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
ठाणे शहरातील बेकायदा घरांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने समूह विकास योजनेची आखणी केली असून घोषणेनंतरही गेल्या काही वर्षांपासून ही योजना कागदावर असल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. ठाणे शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या किसननगर, वागळे इस्टेट, लोक मान्यनगर या भागांत लाखो रहिवासी या योजनेच्या अंमलबजावणीकडे डोळे लावून आहेत. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिका प्रशासनामार्फत किसननगर भागातील समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीचा आराखडा जाहीर करून घेतला. त्यानंतर या मुद्दय़ावर राजकारण रंगू लागले असून शहरातील काही समाजसेवा संस्था तसेच विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी या आराखडय़ात अनेक त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित करत हा केवळ निवडणुकीचा देखावा असल्याचा आरोप केला होता. त्यावर महापालिका प्रशासनाने सविस्तर खुलासा केला असला तरी निवडणुकांच्या रणधुमाळीत हा मुद्दा पुन्हा जोर धरेल हे लक्षात घेऊन शिवसेनेने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली असून किसननगर परिसरात यानिमित्ताने केलेले शक्तिप्रदर्शन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
आंदोलकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न
शिवसेनेने यानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक आवाहन करत या विषयावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. ‘वागळे इस्टेट भागात मी स्वत: लहानाचा मोठा झालो असून इथल्या रहिवाशांना स्वत:च्या हक्काचे, सुरक्षित घरकुल मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. क्लस्टर योजना ही खास अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठीच तयार करण्यात आली असून अन्य कुठल्याही योजनेच्या माध्यमातून येथील इमारतींचा पुनर्विकास शक्य होणार नाही. त्यामुळे आपण सर्व मिळून ही योजना यशस्वी करण्यासाठी एकत्र काम करू या. काही त्रुटी राहिल्या असतील तर चर्चा करून त्या दूर करू या,’ असे आवाहन पालकमंत्र्यांनी या वेळी केले. प्रत्येक पावसाळ्यात इथल्या धोकादायक इमारती कोसळून अनेकांचा मृत्यू होतो. जीवितहानी होऊ नये म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या कुटुंबांना अद्यापही हक्काचे घर मिळालेले नाही. ते मिळवून देण्यासाठी क्लस्टर योजना राबवण्यात येत आहे. मात्र, गैरसमज पसरवून ही योजना झाली नाही तर एकमेव संधी आपल्या हातून निघून जाईल, असे शिंदे म्हणाले. या वेळी या योजनेला आक्षेप घेणारे संजीव साने, उन्मेष बागवे, डॉ. चेतना दीक्षित आदी मंडळीही या सभेस श्रोत्यांमध्ये उपस्थित होती. सभा संपल्यानंतरही एकनाथ शिंदे आणि संजीव साने यांनी एकमेकांशी संवाद साधला.