नालासोपाऱ्यात भोजपुरी, वसईत आगरी गायक प्रचारात
निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांना मतदारांच्या कलाने घ्यावे लागते. या प्रकारात शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे. नालासोपाऱ्यात उत्तर भारतीय मतदार जास्त असल्याने त्यांनी येथे भोजपुरी गायक आणि अभिनेत्यांना पाचारण केले आहे, तर वसईत स्थानिक मराठी मतदारांमुळे आगरी गायकांना प्रचारात बोलावले आहे.
नालासोपारा मतदारसंघातून महायुतीचे प्रदीप शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शर्मा लढवत असलेल्या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. या मतदारांची मनधरणी करण्यासाठी उत्तर प्रदेश येथील अभिनेते व गायक रवी किशन यांना प्रचारासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तर निरहुआ, मनोज तिवारी तसेच इतर भोजपुरी गायक शहरात येत आहेत.
दुसरीकडे वसई विधानसभा मतदारसंघात आगरी, कोळी, भंडारी आदी मतदार मोठय़ा संख्येने आहेत. त्यामुळे त्यांनी येथे भोजपुरी न आणता मराठी गायकांना त्यातही चक्क आगरी गायकांना बोलावले आहे. वसईतील शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील यांच्या प्रचारासाठी आगरी कोळी गीतांचा बादशाह म्हणून गायक संतोष चौधरी ऊर्फ दादूस यांनी हजेरी लावली होती. वसईच्या पूर्वेतील ग्रामीण भागासह पश्चिमेतील भागात मोठय़ा संख्येने आगरी कोळी बांधव राहात असून त्या भागातील मतदारांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. या मतदारांना साद घालण्यासाठी दादूस यांनी उपस्थिती लावली होती. महायुतीकडून केला जाणारा हा अनोखा फंडा कितपत यशस्वी ठरतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.