एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या भारतात सण-उत्सवांना तोटा नाही. सण-उत्सव काळात लोकांची उत्साहस्थिती अर्थव्यवस्थेची गती वाढवणारी ठरावी इतकी खरेदीस पोषक बनते. बाजारातील प्रत्येक आकर्षक  गोष्ट घरात आणण्याचा मनसुबा आर्थिक वकुबानुरूप कमी-अधिक होतो. सण-उत्सव काळात प्राणीपालक स्वत:साठी कपडे, दागिने यांची खरेदी आणि खाण्यापिण्याची चंगळ करताना आपल्या पेट्सलाही त्या-त्या सणांनुरूप आनंदी ठेवण्याची गरज व्यक्त करू लागले. ती गरज ओळखून गेल्या दशकभरात आपल्याबरोबरच घरातील ‘श्वानुल्यां’चे आणि मनीचे लाड करण्यासाठी उत्सवकालीन पेटबाजारपेठ तयार झाली आहे. कपडे, दागिने, खेळणी यांबरोबरच प्राण्यांसाठी त्यांच्या आवडीच्या सुग्रास जेवणाचे डबे पोहोचवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. मे महिना, दिवाळी आणि नाताळच्या सुट्टीचा एकत्रित आनंद घेण्यासाठी प्राणी आणि त्यांच्या पालकांसाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स सुरू झाली आहेत. लाडाकोडात वाढवत असलेल्या श्वानुल्यांसाठी बाजारातील सर्वच नवी ट्रेंड्स भारतीयांनी स्वीकारली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेटफॅशन उद्योग

दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या काळात माणसांप्रमाणेच पेटफॅशन इन्डस्ट्री तेजीत असते. घरातील पाळीव प्राण्यांसाठी कपडे आणि दागिन्यांची स्वतंत्र बाजारपेठ उभी राहिली आहे. या बाजारपेठेतील ट्रेण्डही चित्रपट, कार्टून्स, चर्चेतील विषय यानुसार बदलत असतात. सध्या प्राण्यांसाठी कपडे आणि दागिन्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. फ्रॉक्स, टीशर्ट्स, हुडीज, कोट, शूज, कॉलर्स यांबरोबरच गळ्यात घालण्यासाठी नेकलेस, माळा, लॉकेट, पेंडंट, कान टोचून त्यात घालण्याच्या रिंग असे दागिन्यांचेही प्रकार उपलब्ध आहेत. सध्या ‘पेट फॅशन’मध्ये ‘थीमबेस’ कपडय़ांचा ट्रेंड दिसत आहे. डायनॉसॉर, माकड, सिंह, प्रिन्सेस अशा वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कपडे प्राण्यांसाठी उपलब्ध आहेत. कुत्र्याच्याच वेगवेगळ्या प्रजातींची वैशिष्टय़े असणारे कपडेही आहेत. ‘तिबेटियन मॅस्टिफ’ जातीच्या कुत्र्याच्या चेहऱ्याभोवती असलेल्या आयाळीसारखे स्कार्फ, डाल्मेशिअन जातीच्या कुत्र्यासारखे ठिपक्यांचे टीशर्ट्स मिळत आहेत. दागिन्यांमध्ये क्रोशाचे पट्टे, मोत्याच्या माळा, फरच्या कॉलर्स यांचा ट्रेंड आहे. पाळीव प्राण्यांसाठीच्या विविध उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये यातील अनेक प्रकार मिळतीलच. मात्र ऑनलाइन खरेदीची सुविधा असलेल्या संकेतस्थळांवर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. प्राणीपालकांकडून या उत्पादनांसाठी मागणीही वाढत आहे. साधारण ६०० रुपयांपासून पुढे ड्रेस उपलब्ध आहेत, तर २०० रुपयांपासून पुढे दागिने आणि कॉलर्स उपलब्ध आहेत.

जिभेचे चोचले..

केक, फज, नगेट्स, आईस्क्रीम, मटण टिक्की, चिझी चिकन.. ही हॉटेलच्या मेन्यूकार्डसारखी वाटणारी पदार्थाची यादी पाळीव प्राण्यांसाठी डबे पुरवणाऱ्या कंपनीच्या मेन्यूकार्डमध्ये आहे. घरात समारंभाच्या वेळी पाळीव प्राण्यांनाही रोजच्यापेक्षा वेगळे आणि त्यांना आवडणारे पदार्थ पुरवणाऱ्या व्यवसायाची मोठी साखळी उभी राहिली आहे. संकेतस्थळांवर नोंदणी करून तुम्ही सांगितलेल्या वेळी प्राण्यांसाठी घरी अन्नपदार्थाचा डबा येतो. देशपातळीवर सेवा पुरवणारी ‘डॉगीज डब्बा’ ही सेवा पुणे, मुंबई येथेही तेजीत आहे. स्थानिक पातळीवरही प्राण्याशिवाय ‘डॉग फ्रेंडली हॉटेल्स’ही सुरू झाली आहेत. ज्या ठिकाणी कुत्रे आणि त्याच्या पालकांना एकत्र बसून जेवणाची मजा घेता येईल किंवा कुत्र्यांनाही नेण्याची परवानगी असलेली साधारण १० ते १२ हॉटेल्सही पुण्यात सध्या सुरू आहेत. कोरेगाव पार्क भागातील योगी ट्री, प्रेम, कल्याणीनगरमध्ये ‘द फ्लोअर वर्क्स, विमाननगरमध्ये ‘व्हेअर एल्स कॅफे’, औंधमधील ‘कॅफे जोशा’, बाणेर येथील ‘कॅफे टूज अँड फोरस’, खराडीमध्ये ‘कोकोपॅरा’ येथे आपल्या श्वानांबरोबर एकत्रितपणे जेवणाची मजा घेता येऊ शकते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopping for pet on occasion of festivals
First published on: 22-04-2017 at 02:40 IST