कोलशेत येथील मनोरमानगर भागात राहणारे लावण्या तेजेश देवकुळे (३०) यांच्या घरात दोन लाखांची चोरी केल्याच्या आरोपाखाली पुतण्या आणि त्याच्या मित्राविरोधात कापुरबावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मौजमजा करण्यासाठी त्याने पैसे चोरल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
आईची तब्येत बरी नसल्याचे खोटे सांगून अल्पवयीन मुलाने चोरीसाठी मित्राची मदत घेतली होती, असेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पुतण्या अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायालयापुढे सादर केले. तिथे त्याची जामिनावर सुटका झाली. तर त्याचा मित्र राहुल रवींद्र माने (२३) याला पोलिसांनी अटक केली असून ठाणे न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चार हजार ग्राहकांवर वीजचोरीचा गुन्हा
कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडळातील पोलिसांनी गेल्या वर्षभरात वीजचोरी करणाऱ्या ४ हजार ६६७  ग्राहकांवर गुन्हे दाखल केले आहेत. कल्याण परिमंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्य़ांतील वीज ग्राहकांवर ही कारवाई करण्यात आली. १८ पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे, असे महावितरणच्या पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी सांगितले. मागील वर्षी ४ हजार ५०० वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. वीजचोरीचे गुन्हे तात्काळ दाखल होऊन वीज चोरांवर कारवाई व्हावी म्हणून शासनाने दहा वर्षांपूर्वी महावितरणसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्याचा निर्णय घेतला. वाढते नागरीकरण, वीज ग्राहकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून प्रत्येक जिल्ह्य़ासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करणे गरजेचे होते. कल्याण परिमंडळाच्या पोलीस ठाण्याअंतर्गत ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी जिल्हे आहेत.
वागळे इस्टेट येथे हत्येप्रकरणी पतीला अटक
ठाणे: ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील हनुमाननगर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून २७ वर्षीय महिलेची पतीने चाकू भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.शीतल शर्मा (२७) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी पती ओमनारायण ऊर्फ ओमनाथ शर्मा (३०) याला अटक करण्यात आली आहे. वागळे इस्टेट भागातील रुपादेवी परिसरात शर्मा दाम्पत्य राहत असून त्यांना दोन मुले आहेत. ओमनाथ शीतलच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार भांडणे व्हायची.
यामुळे शीतल दोन्ही मुलांना घेऊन हनुमाननगर परिसरात आईकडे राहण्यासाठी गेली होती. दरम्यान, रविवारी रात्री ओमनाथ याने तिला बोलण्याचा बहाणा करून घराबाहेर बोलाविले आणि तिच्यावर चाकूने वार केले. यात जखमी झाल्याने तिला उपचाराकरिता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
तरुणाला लुटले
उल्हासनगर: येथील राधाबाई चौकातील विजय विला इमारतीत राहणारे नरेश जयरामदास संतुरामानी (३३) आणि त्यांचा मित्र राहुल भोजवानी हे दोघे सोमवारी नीलम बारमधून बाहेर आले. त्या वेळी संतुरामानी त्यांच्या मोटारसायकलजवळ उभ्या असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींना त्यांना बाजूला होण्यास सांगितले. याच कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावरण हाणामारीत झाले. त्या दोघांनी संतुरामानी यांना बेदम मारहाण केली. या वेळी त्यांच्या तावडीतून सुटका करत त्यांनी कल्याणच्या दिशेने पळ काढला. मात्र, या दोघांनी पाठलाग करून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील दोन मोबाइल फोन, रोख रक्कम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, सोनसाखळी असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज लुटला.
दुचाकीची चोरी
अंबरनाथ: साई सेक्शन परिसरातील श्री अपार्टमेंटमध्ये राहणारे किरण बबन मेंढे यांची इमारतीच्या परिसरात उभी असलेली मोटारसायकल चोरून नेण्यात आली. या दुचाकीची किंमत  ७० हजार रुपये आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला.
विकासकाकडून फसवणूक
ठाणे : साडेतीन लाख रुपयांत घर देण्याची बतावणी करून सुमारे शंभर ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी कल्पतरू होम्स बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्सच्या चार विकासकांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरात राहणारे संघरक्षक धर्मा साळवी (३१) यांच्यासह शंभर ग्राहकांनी कल्पतरू होम्स बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्सकडे प्रत्येकी साडेतीन लाख रुपये भरले. मात्र, घरही मिळत नव्हते आणि पैसेही परत मिळत नव्हते.  या प्रकरणी बाजारपेठ पोलीसात विकासक प्रशांत चंद्रकांत बाचीम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.