कळव्याच्या भास्करनगरातील रहिवाशांना पाण्यासाठी रूळ ओलांडणीचे दिव्य; वर्षांकाठी १५ जणांचा मृत्यू
पत्र्याचे छप्पर आणि कच्च्या विटांनी बांधलेल्या घरांचा अरूंद आसरा.. एका घरात पाच ते दहा जणांची कुटुंबे..अशा रितीने तब्बल ७०० झोपडय़ांमध्ये सुमारे ३० हजार नागरिक दाटीवाटीने वसलेले.. वस्तीला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा मात्र दुर रेल्वे रुळाच्या पलिकडे. अशा वेळी पाण्यासाठी धावणाऱ्या नागरिकांची आडव्या रूळांवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या लोकलशी शर्यत सुरू होते. यात कधी लोकल जिंकते तर कधी रहिवाशांची पाण्यासाठीची ओढ. पण अचानक एका क्षणी या दोघांची एकत्र गाठ पडते आणि ‘जीवना’साठीचा संघर्ष करता करताच कुणाचे जीवनच हरपून जाते. कळव्यातील भास्करनगरमध्ये दर वर्षांला १५ मृत्यू असे पाणी आणताना रूळांवर रेल्वेशी गाठ पडल्यामुळे घडले आहेत. पण याचे सोयरेसुतक ना ठाणे महापालिकेला आहे ना येथील लोकप्रतिनिधींना मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरून प्रवास करताना पारसिक बोगद्याच्या डोंगर उतारावर वसलेल्या भास्करनगराला सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. काही दिवसांपुर्वी या परिसरातील एक अकरा वर्षांची मुलगी पाणी टंचाईची बळी ठरली आणि अनेकांचे लक्ष या बेकायदा वस्तीच्या दिशेने स्थिरावले. रेल्वे रूळापलिकडे भावंडांसह पाणी भरण्यासाठी गेलेली गुलिफज्ज परवीन मोहम्मद अनम अन्सारी या मुलीचा रविवारी रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. हा पाणी बळी असल्याची ओरड होत आहे. प्रशासकीय यंत्रणेकडे मात्र हा रेल्वे अपघात आहे एवढीच नोंद आहे. आजारी आईला अंथरुणाला खिळलेली. घरात पाण्याचा थेंबही नाही. वस्तीत कधी पाणी येईल याचा नेम नाही. मग गुलिफज्ज आपल्या लहानग्या भावंडांसह कमरेला कळशी मारुन वाघोबा नगरच्या दिशेने निघाली आणि पाणी भरुन आणताना लोकलच्या धडकेत जीव गमावून बसली. पण गुलिफज्जच्या मृत्यूला काही तास उलटत नाहीत तोच तिच्या कुटुंबाला पाण्यासाठी रूळांपलिकडे झेप घ्यावीच लागली.
पाणी भरुन आणताना या भागात वर्षांकाठी सरासरी १५ जणांचा बळी जातो, असे वस्तीतील काही बुजूर्ग सांगतात. यापैकी तुलसी परशूराम या ६० वर्षीय वृद्ध महिलेची मुलगी आणि मुलाचाही पाणी आणताना बळी गेला. तुलसी अम्माची २५ वर्षांची विवाहीत कन्या जयश्री जैस्वाल सात वर्षांपुर्वी माहेरी आली होती. पाणी भरायला गेली आणि लोकल धडकेत मृत पावली. अम्माचा मुलगाही दोन वर्षांपुर्वी असाच अपघातात गेला. या दोन्ही घटना पाणी आणताना घडल्या. त्यामुळे आता घरातून कोणीही रेल्वे ओलांडून पाणी आणण्यासाठी जात नाहीत. पण पाणी कुठून आणायचे हा पेच कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भास्करनगर आणि वाघोबानगरचा संघर्ष
भास्करनगर आणि वाघोबानगर या रेल्वे रूळांच्या दोन्ही बाजुला वसलेल्या वस्त्या आहेत. एकीकडे भास्करनगरात पाण्यासाठी वणवण करावी लागते, तर वाघोबानगरात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या भागामध्ये पाणी माफिया तयार झाले असून भास्करनगर वस्तीला पाणी पोहचू नये यासाठी सतत प्रयत्न केला जातो.
बिल मात्र नियमित
भास्करनगरला पाण्याची जोडणी दिली नसली तरी जलवाहिन्यांवरून या परिसरात घेण्यात आलेल्या जोडण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना वर्षांकाठी बिल नियमित येत असते. काही ठिकाणी ९०० ते १२०० रुपयांचे बिल नागरिक भरतात, अशी माहिती भास्कनगर वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सई महम्मद खान यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage of water in the bhaskar nagar area forced residents to cross the tracks
First published on: 15-04-2016 at 02:16 IST