Shrikant Shinde birthday celebrations hit in Dombivli traffic jams ysh 95 | Loksatta

खा. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवस जल्लोषाचा डोंबिवलीतील प्रवाशांना वाहन कोंडीचा फटका

या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीचा कामावरुन दमून घरी परतलेल्या डोंबिवलीतील प्रवाशांना चांगलाच फटका बसला.

Srikant Shinde birthday celebrations hit commuters in Dombivli with traffic jams
खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवस जल्लोषाचा वाहन कोंडीमुळे डोंबिवलीतील प्रवाशांना फटका.

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानका जवळील निमुळत्या जागेतील शिवसेना मध्यवर्ति कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शहर शाखेतर्फे कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामुळे शिवसैनिक, पदाधिकारी, नेते यांच्या वाहनांच्या शाखेबाहेरील अरुंद रस्त्यांवर लागलेल्या रांगा. ढोल पथकांचा भर रस्त्यात चाललेला गजर. त्यात खा. शिंदे घटनास्थळी आल्यावर खासदारांच्या ताफ्यातील वाहने उभी करण्यास नसलेली जागा. या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीचा कामावरुन दमून घरी परतलेल्या डोंबिवलीतील प्रवाशांना चांगलाच फटका बसला.

डोंबिवलीतील शिवसेनेची मध्यवर्ति शाखा (बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची) रेल्वे स्थानका जवळ आणि अरुंद रस्त्यावर आहे. या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजल्यापासून स्थानिक शिवसेना पदाधिकारी, नेत्यांची वाहने लगतच्या रस्त्यांवर उभी करण्यात आली होती. संध्याकाळी सहा वाजल्यापासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात वाहतूक कोंडीला सुरुवात झाली होती. रेल्वे स्थानका जवळील अरुंद रस्ता. तेथील पाच ते सहा रिक्षा वाहनतळ. त्यात विविध रस्त्यांवरुन येजा करणारी वाहने शिवसेना शाखे समोरुन इच्छित स्थळी जात होती. शाखेसमोर, लगतच्या गल्लीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा शिवसैनिक, नेते, पदाधिकाऱ्यांची वाहने उभी करण्यात आल्याने या कोंडीत रिक्षा, खासगी वाहने अडकू लागली.

कामावरुन घरी परतणारा नोकरदार वर्ग या कोंडीत अडकला. खासदारांच्या स्वागतासाठी ढोल ताशांचा गजर रस्त्यावरच सुरू होता. कोंडीत आणखी भर पडली होती. खासदार येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर रस्त्यावर फटाक्यांचे खोके लावून ठेवले होते. इंदिरा चौकातून मानपाडा रस्त्याकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांना वळण घेऊन इच्छित रस्त्याला जावे लागत होते. खासदार शिंदे कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याची वेळ झाल्यावर शाखेसमोरील रस्ता पूर्ण बंद झाला. डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस, वाहतूक सेवक याठिकाणी नियोजनासाठी होते. वाहने पुढे सरकण्यासाठी जागा शिल्लक न राहिल्याने नियोजन करणारे वाहतूक पोलीस हतबध्द झाले.

संध्याकाळी साडे सात वाजता खा. शिंदे गणेशाचे दर्शन घेऊन फडके रस्त्याने शाखेच्या दिशेने निघाले. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील १५ ते २० वाहने फडके रस्ता, बाजीप्रभू चौकातील कोंडीत अडकली. ताफा शाखेसमोर आल्यावर मानपाडा रस्ता, फडके रस्ता, केळकर रस्ता, बालभवन रस्ता काही वेळ पूर्णपणे ठप्प झाला. रिक्षेने, खासगी मोटारीने प्रवास करणारे प्रवासी या उत्सवी कार्यक्रमाविषयी तीव्र संताप व्यक्त करत होते. एवढा जल्लोष करायचा होता तर तो सावळाराम महाराज क्रीडासंकुलात केला असता तर कार्यकर्त्यांना त्याचा चांगला लाभ घेता आला असता. नागरिकांना वाहन कोंडीत अडकून उत्सवी मंडळींना काय मिळतेय. वाढदिवस हा आनंदाचा क्षण असताना लोकांची गैरसोय करुन उत्सवी मंडळींनी काय साध्य केले, असा लोकांच्या प्रतिक्रियेचा सूर होता.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 22:15 IST
Next Story
पवन एक्सप्रेसमधील दोन तरुणांचे चोरीच्या संशयातून अपहरण