श्रीखंडेवाडी, डोंबिवली (पू.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरी संस्कृतीतील साऱ्या सुविधांनी युक्त असणाऱ्या सदनिकाधारकांना एकमेकांची सुखदु:खे जाणून घ्यायला सवडही नसते आणि आवडही. काही चाळींनी मात्र बहुमजली इमारतींच्या नव्या अवतारातही माणुसकी आणि शेजारधर्माचा ओलावा टिकून ठेवला आहे. अशा संकुलांपैकी एक म्हणजे डोंबिवलीतील श्रीखंडेवाडी!

नोकरदारांचे शहर अशी डोंबिवलीची प्रामुख्याने ओळख असली तरी याच शहरातील नागरिकांनी सण आणि उत्सवांची परंपरा जपली आहे. गुढी पाडव्याला नववर्ष स्वागतयात्रा काढण्याची परंपरा याच शहरात सुरू झाली. दिवाळीच्या पाडव्याला फडके रोडवर शहरातील तरुणाई एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधते. पूर्व विभागातील श्रीखंडेवाडी ही अशीच एक सदाउत्साही कुटुंबांची वस्ती. पूर्वीची चाळवजा घरे तोडून १९७४-७५ मध्ये इथे श्रीखंडेवाडीत बहुमजली इमारती उभारण्यात आल्या. चाळीत राहणाऱ्या श्रीखंडे नावाच्या गृहस्थांमुळे श्रीखंडेवाडी हे नाव पडले.

गुरुदेव दर्शन, प्रभुछाया, गौरीनंदन, बिंगो प्लाझा, पूर्णिमा दर्शन, दीपेक्स मयूर आदी एकूण १४ इमारती वाडीत आहेत. वसाहतीतील बहुतेक कुटुंबे महाराष्ट्रीय. त्यात अलीकडच्या काळात काही गुजराती कुटुंबांची भर पडली आहे. १९७७ मध्ये वाडीतील तरुणांनी एकत्र येत तरुण मित्र मंडळ स्थापन केले. वाडीतील सारे सार्वजनिक उत्सव या मंडळामार्फत राबविले जातात. पुरुषांबरोबरच महिलाही सार्वजनिक कामात पुढाकार घेतात. गेल्या तीन-चार दशकांपासून एकत्र राहत असल्याने वाडीतील कुटुंबांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सणासुदीच्या दिवशी सारी वाडी एकत्र येते, अशी माहिती तरुण मित्र मंडळाचे सचिव अनिल माळी यांनी दिली.

अगदी सुरुवातीपासूनच वाडीत गणेशोत्सव साजरा होतो. यंदा गणेशोत्सवाचे ४१ वे वर्ष आहे. त्यामुळे सध्या वाडीत गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. ढोल-ताशांच्या गजरात श्रीगणेशांचे उत्साहात स्वागत केले जाते. पाच वर्षांपूर्वी वाडीतील तरुणांनी गर्जना ढोल-ताशा पथकाची स्थापना केली. त्यापूर्वीपासून वाडीतील तरुणांचे झांज आणि लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी होत आहे. उत्सवातील सारी कामे वाटून घेतली जातात. प्रत्येक जण आपल्याला नेमून दिलेले काम चोखपणे करतो. त्यामुळे कुणावरही ताण न येता उत्सव आनंदाने साजरा होतो. मिरवणुकीतील चित्ररथ तसेच पालखीची संपूर्ण जबाबदारी येथील महिला मंडळातर्फे पार पाडली जाते. गणेशोत्सवाप्रमाणेच येथे दिवाळी, नवरात्री, दहीहंडी, शिवजयंती यांसारखे अनेक सण साजरे केले जातात. त्यानिमित्त स्थानिकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. वाडीत वाचनकट्टा उपक्रम राबविला जातो. विशेष म्हणजे या उपक्रमात वाडीतील लहान मुलांनी पुढाकार घेतला आहे. पुस्तक देवघेवीतून वाचनाची आवड जोपासली जाते. क्रिकेट तसेच कॅरम स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी वाडीमध्ये भिंतींवर संदेश लिहिण्याची स्पर्धाही घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, दहावी-बारावी उत्तीर्णाचा कौतुक सोहळा असे उपक्रम वाडीत होतात. त्यामुळे ‘आपले घर भले आणि आपण’ अशी संकुचित वृत्ती श्रीखंडेवाडीत कुठेही आढळून येत नाही. त्यामुळे एरवी अपार्टमेंट संस्कृतीतील भयाण शांतता इथे आढळून येत नाही. आजूबाजूच्या धावपळीच्या जीवनाचा कोणताही परिणाम होऊ न देता ही वस्ती निवांतपणे आपल्या पद्धतीने आला दिवस साजरा करते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrikhande wadi dombivli furnished with all the amenities
First published on: 15-08-2017 at 01:16 IST